पुढारी ऑनलाईन डेस्क: यंदा २३ सप्टेंबरपासून भारतातून मान्सून परतीला सुरूवात झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने २०२४ च्या मान्सून हंगामाचा आढावा घेतला आहे. यामध्ये २०२४ च्या मान्सून हंगामात (monsoon season 2024) सामान्यपेक्षा ७.६ टक्के अधिक पाऊस झाला आणि त्यानंतर मान्सून माघारी परतल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाने आज (दि.१ ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्याचे वृत्त 'PTI'ने दिले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने मंगळवारी सांगितले की, भारताचा मान्सून हंगाम 30 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे पूर्ण झाला. २०२४ मान्सूनचा हंगाम सामान्यपेक्षा ७.६ टक्के अधिक पावसाने संपला. राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जास्त पाऊस झाला. भारताच्या पूर्व आणि ईशान्य भागांतील प्रदेशामध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु याठिकाणी १४ टक्के कमीच पाऊस झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मान्सून महत्त्वाचा आहे. देशातील ५२ टक्के निव्वळ लागवड क्षेत्र हे मान्सूनवर अवलंबून आहे. ही प्राथमिक पर्जन्यप्रणाली देशभरात पिण्याचे पाणी पुरवणारे आणि वीज निर्मितीला आधार देणारे जलाशय भरून काढण्यासाठी देखील आवश्यक आहे.