Monsoon Weather Forecast Update
उत्तर भारतात पावसाचा जोर आणखी वाढणार   File Photo
राष्ट्रीय

मान्सूनचा जोर वाढणार! देशातील 'या' भागाला मिळणार दिलासा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'हिट वेव'ने हैराण झालेल्या उत्तर भारतीयांना मान्सूनच्या हजेरीने काही प्रमाण दिलासा मिळणार आहे. पुढील २ ते ३ दिवसांत उत्तर भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

दिल्ली हवामान विभागाच्या हवामान शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी म्हटले आहे की, " पूर्व उत्तर प्रदेशात मान्सूनने अधिक प्रगती केली आहे. दरम्यान पुढील 2-3 दिवसांत मान्सून पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाचाही बहुतांश भाग व्यापेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील बहुतांशी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे".

ईशान्य भारतातील 'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

पुढील ४ ते ५ दिवसांत वायव्य आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पूर्व राजस्थानसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण मध्य भारतात देखील मुसळधार पाऊस पडेल. तसेच आज (दि.२९ जून)आणि उद्या (दि.३० जून) अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

येत्या दोन दिवसात दिल्लीत मुसळधार

उद्यापासून पश्चिम द्वीपकल्पीय प्रदेशात पावसाचा जोर वाढेल. उत्तर भारतीय राज्यांमध्येही अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. तसेच येत्या दोन दिवसात राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे, असेही शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी स्पष्ट केले आहे.

मान्सून उत्तर प्रदेशमध्ये आणखी पुढे सरकला

नैऋत्य मान्सून आज, २९ जून २०२४ रोजी पूर्व उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकला आहे. नैऋत्य मान्सून पश्चिम राजस्थान, हरियाणा-चंडीगड आणि पंजाबच्या आणखी काही भागांमध्ये आणि पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मूच्या उर्वरित भागांमध्ये पुढील २ ते ३ दिवसांत आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचेही; हवामान विभागाने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT