राष्ट्रीय

Monsoon Update | रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ राज्यांत मुसळधारेचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांत उघडीप घेतली आहे. मात्र पुढील काही दिवसांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीनध्ये आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

आता देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट नसणार- IMD

पुढील २ दिवसांत उप-हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयात या राज्यांत देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढे मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. तसेच पुढील ४-५ दिवसांत देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट नसणार आहे, अशी शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

'या' भागांत मान्सून पुढे सरकला

गेल्या काही दिवसांपासून रखडलेला नैऋत्य मान्सून सध्या सक्रिय झाला आहे. दरम्यान तो विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, वायव्य बंगालचा उपसागर, उप-हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये पुढे सरकला आहे.

पुढील ३ ते ४ दिवसांत या भागात मान्सून पोहचणार

पुढील ३ ते ४ दिवसांत बिहारचा आणखी काही भाग आणि पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, वायव्य बंगालचा उपसागर, गंगेकडील पश्चिम बंगालचा काही भाग, उप-हिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, झारखंडच्या काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT