राष्ट्रीय

Monsoon Update | मान्सून केरळमध्ये दाखल, मुंबईत कधी पोहोचणार? IMD ने दिली माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: केरळमध्ये गुरुवार ३० मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. हवेतील आर्द्रतेमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असून, मान्सूनची आगेकूच वेगाने होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मान्सून आता लवकरच मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी तो गोवा आणि दक्षिण सिंदुधुर्ग आणि पुणेमार्गे महाराष्ट्रात (Monsoon Update) पोहचू शकतो, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्यतः मान्सून केरळमध्ये १ जून रोजी पोहोचतो. परंतु यावेळी तो ३० मे रोजी म्हणजे दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर आता मान्सून कर्नाटक, रत्नागिरी, सिंधुदुर्गमार्गे गोव्यातून मुंबईत दाखल होणार आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी १० दिवस लागतात. वाऱ्याचा वेग जसा बदलेल तसा मान्सूनचा वेगही बदलणार (Monsoon Update) आहे. त्यामुळे मान्सून मुंबईत लवकरच दाखल होईल, असे मत हवामान शास्त्रनांनी व्यक्त केले आहे.

Monsoon Update: मान्सूनच्या दोन्ही शाखा एकाचवेळी सक्रिय

मान्सूनच्या दोन्ही शाखा एकाचवेळी अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवा, दक्षिण महाराष्ट्र आणि पुणे याठिकाणी २ जूनच्या सुमारास मान्सून पोहचण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिणेकडील मान्सूनच्या हालचालींना वेग असल्याने गोवा (५ जून), दक्षिण सिंदुधुर्ग (दि.६ जून), पुणे (१० जून) आणि मुंबईत ११ जून रोजी मान्सून दाखल होण्याची अंदाज पुणे हवामान विभागाचे निवृत्त विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी एक्स पोस्टवरून सांगितले आहे.

येत्या काही दिवसांत तापमान कमी राहणार

वेळेआधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याने उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो. गुरुवारी मुंबईचे तापमान ३५ अंशांवर पोहोचले. त्याचवेळी, आर्द्रता 80% ते 90% नोंदवली गेली. आर्द्रतेमुळे येत्या काही दिवसांत तापमान कमी राहणार असले तरी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. हवेतील आर्द्रता हा मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारा घटक आहे, असेही हवामान विभागाचे म्हणणे आहे.

'रेमल'मुळे मान्सूनचा वेग वाढला

IMD ने यापूर्वी 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु चक्रीवादळ रेमलमुळे, मान्सून वेगाने पुढे गेला आहे आणि केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतेक भागात वेळेपूर्वी पोहोचला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

SCROLL FOR NEXT