PM Modi Monsoon Session 2025  file photo
राष्ट्रीय

PM Modi Monsoon Session 2025 : २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर, महागाई २ टक्क्यांपर्यंत खाली! संसदेच्या अधिवेशनापूर्वी PM मोदींचा मोठा दावा

Monsoon Session 2025 live updates : संसदेच्या मान्सून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचे चित्र मांडले.

मोहन कारंडे

PM Modi Monsoon Session 2025

दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला 'देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा आणि महागाईचा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याचा,' दावा केला आहे. जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली असल्याचे सांगत त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुकही केले.

२२ मिनिटांत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी

पावसाळी अधिवेशनापूर्वी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण जगाने भारताच्या लष्करी सामर्थ्याचे, भारतीय सैन्याच्या ताकदीचे रूप पाहिले आहे. भारतीय सैन्याने ठरवलेले १०० टक्के लक्ष्य साध्य केले. शत्रूच्या घरात घुसून, दहशतवादी अड्डे २२ मिनिटांत उद्ध्वस्त केले. संपूर्ण जगाने मेक इन इंडियाची शक्ती पाहिली आहे. जेव्हा जेव्हा मी परदेशातील सहकाऱ्यांना भेटतो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते. जेव्हा या अधिवेशनादरम्यान सभागृह विजयोत्सवाच्या भावनेने एका आवाजात व्यक्त करेल, तेव्हा भारताची लष्करी शक्ती मजबूत होईल. देशाला प्रेरणा मिळेल आणि लष्करी क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामालाही चालना मिळेल. मेक इन इंडियाला चालना मिळेल. यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मोदी म्हणाले.

२५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर

देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ पूर्वी देशात असा एक काळ होता जेव्हा महागाईचा दर दोन अंकी होता. आज, हा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याने, देशातील सामान्य लोकांच्या जीवनात एक दिलासा मिळाला आहे. २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, ज्याचे जगातील अनेक संस्था कौतुक करत आहेत."

'देश तिसऱ्या अर्थव्यवस्थेच्या दाराशी उभा आहे'

भारताच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, "आर्थिक क्षेत्रात, जेव्हा तुम्ही सर्वांनी आम्हाला २०१४ मध्ये जबाबदारी दिली होती, तेव्हा देश नाजूक पाचच्या टप्प्यातून जात होता. २०१४ पूर्वी, आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होतो. आज, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT