Monsoon 2025 India IMD forecast
नवी दिल्ली : पावसाने देशाच्या विविध भागांमध्ये जोरदार प्रगती केली असून, येत्या २५ जूनपर्यंत तो वायव्य भारताचा बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
गेल्या चोवीस तासांत किनारपट्टी कर्नाटक, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. कर्नाटकातील कारवार येथे सर्वाधिक २४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची सध्याची प्रगती समाधानकारक असून, तो वेळेवर वायव्य भारताच्या दिशेने सरकत आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.
(१२ जून २०२५ सकाळी ८.३० ते १३ जून २०२५ सकाळी ८.३० पर्यंत, मिमीमध्ये)
किनारपट्टी कर्नाटक : कारवारमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली, २४२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल होनावर येथे १२१ मिमी आणि मंगळूर (बाजपे) येथे ७२ मिमी पावसाची नोंद झाली.
कोकण आणि गोवा: गोव्याची राजधानी पणजी येथे ९१ मिमी पाऊस झाला. मुरगाव येथे ५७ मिमी, तर रत्नागिरीत ४१ मिमी पाऊस कोसळला आहे.
मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर होता, येथे ६९ मिमी पावसाची नोंद झाली.
केरळ आणि माहे : कोचीन विमानतळ परिसरात ४१ मिमी पाऊस झाला.
मिझोराम : ईशान्येकडील मिझोराममधील लेंगपुई येथे ४७ मिमी पावसाची नोंद झाली.
अंदमान आणि निकोबार बेटे : श्री विजया पुरम येथे ५७ मिमी आणि हट बे येथे ४० मिमी पाऊस झाला.
लक्षद्वीप : मिनिकॉय बेटावर ५७ मिमी पावसाची नोंद झाली.