औरैया : उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली असून, तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येथे एका माकडाने बिधूना तहसील परिसरात चक्क ‘नोटांचा पाऊस’ पाडला. हा कोणताही बनावट व्हिडीओ नसून, ही खरी घटना आहे आणि यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. दोंडापूर गावचे रहिवासी रोहिताश चंद्र आपल्या जमिनीच्या नोंदणीसाठी तहसील कार्यालयात आपल्या वडिलांसोबत आले होते. त्यांनी आपल्या गाडीच्या डिक्कीत रोख 80,000 रुपये ठेवले होते. रोहिताश वकील गोविंद दुबे यांच्यासोबत कागदपत्रांवर चर्चा करत असताना एका माकडाने त्यांच्या गाडीची डिक्की उघडली. त्यातील पैशांची पिशवी उचलली आणि परिसरातील एका झाडावर ते चढले.