राष्ट्रीय

Mohan Majhi : मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री! 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नावांनाही मंजुरी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ओडिशातही सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपने मोहन चरण माझी यांची निवड केली आहे. या राज्यातही भाजपने एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला लागू केला आहे. त्यामुळे ओडिशाचे दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी एक महिला आहेत. पार्वती परिदा आणि केव्ही सिंग देव हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बुधवारी (12 जून) जनता मैदानावर एका भव्य समारंभात शपथविधी सोहळा होणार आहे.

ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा आरामात गाठला आणि नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाला सत्तेतून पायउतार केले. पटनायक हे 2000 ते 2024 पर्यंत सलग 24 वर्षे 98 दिवस राज्याचे मुख्यमंत्री राहिले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपने आता मोहन माझी यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. त्यामुळे तब्बल अडीच दशकांनंतर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे.

मोहन माझी हे आदिवासी समाजातून येतात. त्यांना मुख्यमंत्री करून भाजपनेही या समाजातील आपली पकड मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. माझी यांनी ओडिशातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असणा-या केओंझार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी या जागेवरून बिजू जनता दलाच्या नीना माझी यांचा 11 हजार 577 मतांनी पराभव केला. 52 वर्षीय माझी यांनी चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

पार्वती परिदा आणि केव्ही सिंह देव उपमुख्यमंत्री

राज्याच्या नवीन उपमुख्यमंत्री पार्वती परिदा यांनी निमापारा येथून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी बीजेडीचे दिलीप कुमार नायक यांचा 4588 मतांनी पराभव केला. ओडिशाचे दुसरे उपमुख्यमंत्री होणारे कनक वर्धन सिंग देव हे पतनगढचे आमदार आहेत आणि निकराच्या लढतीत त्यांनी बीजेडीच्या सरोज कुमार मेहर यांचा 1357 मतांनी पराभव केला.

विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा?

ओडिशामध्ये नुकत्याच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 147 विधानसभा जागांच्या या राज्यात भाजपने बहुमताचा जादुई आकडा पार करत 78 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी अडीच दशके सत्तेत असलेल्या बिजू जनता दलाच्या केवळ 51 जागा मिळाल्या. काँग्रेसला 14 जागा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एक जागा मिळाली. तर तीन उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाले.

SCROLL FOR NEXT