Mohan Bhagwat File Photo
राष्ट्रीय

Mohan Bhagwat: नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांच्याशी संवाद साधा; मोहन भागवत यांचे मोठे विधान

आजची नवी पिढी प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारते आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमागील तर्क समजावून सांगणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे मुलांशी संवाद साधायला हवा,’ असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

पुढारी वृत्तसेवा

Mohan Bhagwat

दिल्ली: ‘पूर्वीचा काळ हा केवळ आज्ञा पालनाचा होता, मात्र आता काळ बदलला आहे. आजची नवी पिढी प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारते आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमागील तर्क समजावून सांगणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे घरोघरी आदेश देण्याऐवजी मुलांशी संवाद साधायला हवा. कुटुंबात ‘डिप्रेशन’ नाही, तर ‘डिस्कशन’ व्हायला हवे,’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. दिल्लीत आयोजित ‘विश्व मंगलम् सभा’ या कार्यक्रमात परिवार, संस्कार आणि नव्या पिढीच्या संगोपणावर भाष्य करताना ते बोलत होते.

आजचे वातावरण भौतिक साधने आणि प्रसिद्धीच्या प्रभावाने वेढलेले आहे. या गोंधळातून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना अधिक आपुलकी आणि वेळ देण्याची गरज आहे, यावर भागवत यांनी भर दिला. “आम्ही लहान असताना आई-वडिलांच्या सांगण्यावर प्रश्न उपस्थित केले जात नसत. पालकांवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असायची. पण आज परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे मुलांशी सातत्याने संवाद चालू ठेवणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

आजच्या कौटुंबिक स्थितीवर चिंता व्यक्त करताना सरसंघचालक म्हणाले की, सध्या घरांमधील आपापसातील संवाद जवळपास बंद झाला आहे. पती-पत्नी ऑफिसमधून थकून येतात आणि मुलेही शाळेतून परततात. रात्री जेवण झाल्यावर प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. ही अतिशय चुकीची सवय आहे. पालकांनी मोबाईल बाजूला ठेवून मुलांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले पाहिजे, जेणेकरून मुले मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतील.

संस्कार आदेशातून नव्हे, वर्तनातून घडतात

मुलांच्या विचारांची कक्षा रुंदावण्यासाठी त्यांना नातेवाईकांशी जोडून ठेवा आणि एकत्र प्रवासाला घेऊन जा, असा सल्लाही त्यांनी दिला. पालकांनी अद्ययावत राहावे: मूलं आयुष्यात कितीही मोठे झाले किंवा परदेशात गेले, तरी त्याला आपल्या मुळांची आणि कुटुंबाची आठवण येतेच. अशा वेळी मुलाने घरी येऊन काही प्रश्न विचारला आणि पालकांकडे त्याचे उत्तर नसेल, तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे पालकांनी स्वतःही माहितीपूर्ण असणे आवश्यक आहे.

आजची पिढी केवळ सांगण्याने ऐकत नाही, तर ती मोठ्यांच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करते. जर वडील स्वतः खोटे बोलत असतील, तर मुले ते लगेच पकडतात. त्यामुळे संस्कार हे आपुलकी, संवाद आणि स्वतःच्या चांगल्या उदाहरणांतूनच दिले जाऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT