Mohan Bhagwat
नवी दिल्ली: हिंदू धर्म संपूर्ण मानवतेच्या एकतेवर विश्वास ठेवतो; त्यामुळे “जर कोणत्याही हिंदूला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो व्यक्ती हिंदूच नाही,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
शनिवारी न्यू यॉर्क येथे आयोजित ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. “विविध धर्मांचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, परंतु सत्य आणि मानवता एकच आहे,” असे सांगत भागवत पुढे म्हणाले, “आम्ही अशा समाजातून येतो जिथे संपूर्ण मानवता एक मानली जाते. जर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवून घेत असाल, तर सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात आणि प्रत्येक माणसाचा सन्मान केला पाहिजे यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. मानवा-मानवांमध्ये कोणताही भेद असू शकत नाही.”
विविधतेचे रक्षण करणे हा निसर्गाचा नियम असून एकता हेच अंतिम सत्य आहे, असे त्यांनी सांगितले. “मी धर्मशास्त्रज्ञ किंवा धार्मिक अधिकारी नाही. पण मी अशा समाजात कार्य करतो जो पारंपरिकदृष्ट्या हेच मानतो की धर्म भिन्न असले तरी मानवता एकच आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
'विविधतेतील एकता' भारतीय संस्कृतीच्या डीएनएमध्ये!
अमेरिकेतील ‘प्लुरॅलिझम’ आणि भारतातील ‘विविधतेतील एकता’ यांची तुलना करताना सरसंघचालक म्हणाले, “अमेरिकेचा उल्लेख होतो तेव्हा ‘बहुलतावाद’ या शब्दाची चर्चा होते, तर भारताचा उल्लेख होतो तेव्हा ‘विविधतेतील एकता’ या संकल्पनेवर भर दिला जातो. भारतासाठी एकता आणि विविधता या दोन्ही गोष्टी त्याच्या डीएनएमध्येच सामावलेल्या आहेत.”
अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग या संस्थेने ‘रक्षाबंधन’ निमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. “हे जग एक कुटुंब आहे (वसुधैव कुटुंबकम्) हाच या कार्यक्रमाचा सार्वकालिक संदेश आहे. मानवनिर्मित भेदभाव आणि मतभेद विसरून प्रत्येकाने परस्पर आदर आणि एकतेची भावना जपावी,” असे आयोजकांनी सांगितले.