राष्ट्रीय

Mohan Bhagwat : ‘भारतात राष्ट्र आणि धर्म वेगळे नसून एकमेकांना पूरक’ : सरसंघचालक मोहन भागवत

भारताने प्राचीन काळापासून आपले ज्ञान संपूर्ण जगासोबत वाटले आहे; कोणत्याही देशावर आक्रमण करून किंवा धर्मांतर करून नव्हे तर प्रेमाने आणि सेवेने हा विचार पोहोचवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात राष्ट्र आणि धर्म या दोन भिन्‍न संकल्पना नसून त्या एकमेकांना पूरक आहेत. सध्या संपूर्ण जग अनेक गंभीर आव्हानांना आणि संकटांना सामोरे जात असून भारताचे समृद्ध आध्यात्मिक ज्ञान या सर्व समस्यांवर मार्ग दाखवू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

‘अखिल भारतीय विहार सेवा’ समूहाच्या १४ व्या परिषदेला संबोधित करताना सरसंघचालकांनी राष्ट्र आणि धर्माच्या संबंधांवर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, आपल्या देशात राष्ट्र आणि धर्म परस्परांपासून वेगळे नाहीत. राष्ट्राचे मूळ प्रयोजन धर्म आहे तर धर्म राष्ट्राचे पोषण आणि संरक्षण करतो. हे दोन्ही घटक परस्परांवर अवलंबून आहेत.

जागतिक समस्या आणि असंतुलन

सध्याच्या जागतिक स्थितीवर चिंता व्यक्त करताना भागवत म्हणाले की, जग सध्या अनेक मोठ्या पेचांना तोंड देत आहे. विकास साधताना पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, वैयक्तिक स्वातंत्र्याचा सन्मान राखताना कौटुंबिक सौख्य कसे टिकवावे आणि धार्मिक श्रद्धा जपताना संघर्ष कसा टाळावा, असे अनेक तिढे निर्माण झाले आहेत. जगात आज कुठेही समतोल राहिलेला नसून टोकाची भूमिका घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. प्रत्येक सुखात काहीतरी उणीव भासत आहे आणि आकांक्षांच्या पूर्ततेसाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

भारताचा समृद्ध ज्ञानवारसा

या सर्व समस्यांवर भारतच मार्ग दाखवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताने प्राचीन काळापासून आपले ज्ञान संपूर्ण जगासोबत वाटले आहे; कोणत्याही देशावर आक्रमण करून किंवा धर्मांतर करून नव्हे तर प्रेमाने आणि सेवेने हा विचार पोहोचवला आहे. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्‌गीता, जैन आगम, त्रिपिटक, गुरुग्रंथ साहिब आणि संतांचे विचार हे भारताचे महान ज्ञानभांडार आहे. आज संपूर्ण जगाला या विचारांची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले.

संपूर्ण मानवतेचे रक्षण

हा महान ज्ञानवारसा पुढे नेणाऱ्या परंपरा आणि व्यक्तींचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. हा केवळ एका विशिष्ट घटकाचा किंवा धर्माचा प्रश्न नसून, अखिल मानवजातीच्या सुरक्षित भविष्याचे रक्षण करण्याचा हा मार्ग आहे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

अतूट नाते : भारतात राष्ट्र आणि धर्म वेगळे नसून, राष्ट्राचा मूळ हेतू धर्मपालन आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो.

जागतिक असंतुलन : सध्या जगभरात विकास विरुद्ध पर्यावरण, वैयक्तिक स्वातंत्र्य विरुद्ध कुटुंबव्यवस्था आणि धार्मिक निष्ठा विरुद्ध संघर्ष यावरून टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत.

भारताकडून अपेक्षा : जगातील या सर्व विरोधाभासांवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आज संपूर्ण जग आशेने भारताकडे पाहत आहे.

मानवतेचे रक्षण : संतपरंपरा, वेद-उपनिषदे आणि समृद्ध ज्ञानभांडार जपणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नसून, अखिल मानवजातीच्या भविष्याचे रक्षण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT