नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) दिल्लीतील 'केशव कुंज' या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
आरएसएसच्या दिल्लीतील 'केशव कुंज' कार्यालयाच्या इमारतीची रचना गुजरातचे वास्तुविशारद अनुप दवे यांनी केली. या इमारतीचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले होते. ८ वर्षांमध्ये ही इमारत पूर्ण झाली. ही इमारत तब्बल १५० कोटी रुपये खर्चून बांधलेली असून ३.७५ एकर जागेत हे कार्यालय पसरले आहे.
आरएसएसच्या या नवीन कार्यालयात साधना, प्रेरणा आणि अर्चना असे प्रत्येकी १२ मजल्याचे ३ टॉवर आहेत. यामध्ये एकुण ३०० खोल्या आहेत. ज्या पैशातून हे कार्यालय तयार झाले ते पैशे देशभरातील ७५ हजार लोकांनी दान केल्याचा दावा केला जात आहे. आरएसएसच्या या इमारतीत विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुख्य सभागृह बांधण्यात आले आहे. त्यामध्ये ४०० पेक्षा अधिक तर दुसऱ्या एका सभागृहात हॉलमध्ये ६५० लोक बसू शकतात. तसेच या इमारतीत एक ग्रंथालय, छोटोखानी दवाखाना आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प देखील आहे. त्यामुळे या परिसरातील गरीब लोकांना उपचार घेता येतील. आणि बाहेरील लोक देखील ग्रंथालयाचा वापर करू शकतील. आरएसएसच्या या इमारतीला आधुनिक आणि जुने असे दोन्ही स्वरूप देण्यात आले आहे.