Mohammad Faraz | पाकिस्‍तानचा 'टार्गेट किलर' भोपाळमध्ये गजाआड 
राष्ट्रीय

Mohammad Faraz | पाकिस्‍तानचा 'टार्गेट किलर' भोपाळमध्ये गजाआड

पाक हँडलर्सच्या संपर्कातील मोहम्मद फराजला एटीएसने केले अटक

पुढारी वृत्तसेवा

भोपाळ; वृत्तसंस्था : पाकिस्तानी हँडलर्सकडून भारतात टार्गेट किलिंग करण्यासाठी विशेष निवड केलेल्या मोहम्मद फराज नावाच्या एका तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) भोपाळमधील काझी कॅम्प परिसरातून अटक केली आहे. फराज दहशतवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानला जाण्याच्या तयारीत होता. एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये काम करणारा फराज मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत होता आणि गुप्त कारवायांसाठी डार्क ॲप्सचा वापर करत होता. एटीएसने ही संपूर्ण कारवाई अत्यंत गुप्तपणे पार पाडली, ज्याची माहिती स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली नव्हती.

अटक केल्यानंतर फराजविरुद्ध यूएपीए आणि देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फराज केवळ ऑनलाईन संपर्कातच नव्हता, तर तो विशेष दहशतवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानला जाण्याच्या तयारीत होता. एटीएसने त्याच्या मोबाईल फोनमधून पाकिस्तानमधून पाठवलेल्या अनेक आक्षेपार्ह आणि जिहादी माहिती असलेल्या पीडीएफ फाईल्स जप्त केल्या आहेत. याशिवाय, सोशल मीडियावर गाझाच्या समर्थनार्थ त्याने काही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचेही तपासात उघड झालेे.

फराज हा उत्तर प्रदेशातील देवबंद येथील नईम नावाच्या एका मित्राच्या माध्यमातून या पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात आला होता. त्यामुळे आता तपास यंत्रणांचे लक्ष उत्तर प्रदेशातील देवबंद मदरशाशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर केंद्रित झाले आहे.

टेलिग्राम आणि व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून संपर्कात

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद फराज हा टेलिग्राम आणि व्हॉटस्ॲ‌पच्या माध्यमातून थेट पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता. इस्लामिक कट्टरतावादाचा विस्तार करण्यासाठी ऑनलाईन मीटिंगद्वारे त्याला जिहादची शपथ देण्यात आली होती. पाकिस्तानी हँडलर्सकडून त्याला सातत्याने जिहादी व्हिडीओ पाठवले जात होते आणि देशात 'टार्गेट किलिंग' (थेट लक्ष करून हत्या करणे) करण्यासाठी त्याची विशेष निवड करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT