भोपाळ; पीटीआय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरच्या कबुलीजबाबाचा व्हिडीओचा संदर्भ देत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल लष्कराचे कौतुक केले आहे. या ऑपरेशनने डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असे ते म्हणाले. या व्हिडीओमध्ये, ‘जैश’च्या एका शीर्ष कमांडरने 7 मे रोजी झालेल्या लष्करी कारवाईत दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाल्याचे कबूल केले आहे.
येथील एका कार्यक्रमात मोदी म्हणाले, मंगळवारीच देशाने आणि जगाने पाहिले आहे की, कशाप्रकारे एक पाकिस्तानी दहशतवादी रडून आपले दुःख सांगत होता. हा नवा भारत आहे. तो कोणाच्या अणुबॉम्बच्या धमकीला घाबरत नाही... तो घरात घुसून मारतो.
ते पुढे म्हणाले, देश भारतमातेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आमच्या बहिणी-मुलींचा सिंदूर पुसला. आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आमच्या शूर सशस्त्र दलांनी पाकिस्तानला क्षणार्धात गुडघे टेकायला भाग पाडले. मंगळवारीच देशाने आणि जगाने पाहिले की, आणखी एक पाकिस्तानी दहशतवादी रडत-रडत आपली व्यथा सांगत होता. हा नवा भारत आहे, जो कोणाच्याही अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरत नाही, असा इशारा मोदी यांनी दिला. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा कुरापत केल्यास ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम हाती घेण्यात येईल, असा दम दिला.
‘जैश’चा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने एका व्हिडीओ संदेशात कबूल केले की, 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय क्षेपणास्त्रांनी बहावलपूरमधील संघटनेचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. यात मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाले आणि संघटनेला मोठा धक्का बसला.