हैदराबाद; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना मिश्कील शैलीत एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिली. केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत गुजरातला जे काही दिलं, ते सर्व तेलंगणालाही देण्यासाठी मी तयार आहे, पण तुम्ही माझ्यासोबत या, असे मोदी म्हणाले. हैदराबादमध्ये 9400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान हा हलकाफुलका संवाद रंगला. मोदींच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींनाही हसू आवरले नाही.
या कार्यक्रमात रेवंत रेड्डी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील गुजरातच्या विकासाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळात ‘गुजरात मॉडेल’ विकसित झाले. त्याचप्रमाणे पुढील दहा वर्षांत तेलंगणातही ‘तेलंगणा विकास मॉडेल’ साकार व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. भारताच्या विकासासोबत तेलंगणालाही पुढे नेले पाहिजे. आमच्या विकास प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी आपण दोन तास वेळ द्यावा.
रेवंथ रेड्डी यांच्या भाषणाला उत्तर देताना मोदी म्हणाले, ‘मनमोहन सिंग सरकारने गुजरातला जे दिले होते, तेच मी तुम्हालाही देण्यासाठी तयार आहे, पण त्यानंतर तुमच्या राज्याला केंद्राकडून मिळणार्या निधीत घट होईल आणि उद्दिष्टे पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत आलात तर चांगले.’
तेलंगणा दौर्यात मोदी यांनी वारंगल येथे देशातील पहिले पूर्णपणे कार्यरत पीएम मित्रा पार्कचे उद्घाटनही केले. सुमारे 1700 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाला काकतीय मेगा टेक्स्टाईल पार्क म्हणूनही ओळखले जाते. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या फाईव्ह एफ व्हिझन वर आधारित आहे. फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन. शेतापासून बाजारपेठेपर्यंतचा संपूर्ण प्रवास एका साखळीत जोडण्याचा हा प्रयत्न आहे.