राष्ट्रीय

Minister give Resignation : मोदी सरकारमधील मंत्र्यांनी दिला राजीनामा! राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून तातडीने मंजुरी

India politics : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिट्टू यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मोदी सरकारमधील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. आगामी वर्षात होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिट्टू यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत असून, भारतीय जनता पक्ष त्यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

रवनीत सिंह बिट्टू हे मोदी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर भाजपच्या वतीने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही. त्यामुळेच ते लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. बिट्टू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ मागील महिन्यातच पूर्ण झाला होता.

आगामी वर्षात फेब्रुवारी-मार्च महिन्यांच्या दरम्यान पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. पंजाबमध्ये सध्या सत्ताधारी आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात चतुष्कोणी आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. बिट्टू यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, तरीही पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले होते.

आता राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने आणि पंजाब विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने पक्षाने त्यांना संघटनाव्यवस्थेत आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा त्याग केला असून, लवकरच ते पंजाब राजकारणात मोठी भूमिका बजावताना दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT