नवी दिल्ली :ट्विशा शर्मा कथित हुंडाबळी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटो) दखल घेतली. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.
माध्यमांतील वृत्ते आणि इतर संबंधित परिस्थिती या बाबींचा आधार घेत, शनिवारी या 'सुओ मोटो' प्रकरणाची नोंद करण्यात आली. ट्विशा शर्माचे पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समर्थ सिंग याने शुक्रवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर, कनिष्ठ न्यायालयात शरणागती पत्करली; त्यानंतर त्याला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, गिरीबाला सिंग यांना मंजूर झालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.