नवी दिल्ली : मोबाईल वापरकर्त्यांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांसाठी डेटाशिवाय केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा असलेले रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ट्रायने दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) नियम, २०२६ जारी केले आहेत. या निर्णयामुळे मोबाईल डेटा वापरत नसलेल्या ग्राहकांना अनावश्यक डेटासाठी पैसे मोजण्याची गरज राहणार नाही. ग्राहक आपल्या गरजेनुसार केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन निवडू शकतील.
३० दिवसांपर्यंतचे प्लॅन देणे आवश्यक
ज्या ग्राहकांना ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी रिचार्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी कंपन्यांना व्हॉइस आणि एसएमएसचे स्वतंत्र प्लॅन उपलब्ध करून द्यावे लागतील. आतापर्यंत अशा प्रकारचे प्लॅन मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते. नव्या नियमांमुळे विशेषतः ज्याचा मोबाइल डेटा वापर कमी आहे किंवा जे इंटरनेटचा वापर करत नाहीत, अशा ग्राहकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
दर महिन्याला एकाच तारखेला रिचार्जची सुविधा ट्रायने ग्राहकांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. कंपन्यांना ग्राहकांना दर महिन्याला एका ठराविक तारखेला रिचार्जचे नूतनीकरण करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. यामुळे प्रत्येक महिन्यात रिचार्जची वेगवेगळी वैधता संपण्याच्या तारखांचा हिशेब ठेवण्याची गरज कमी होईल. ग्राहक आपल्या सोयीची तारीख निवडून दर महिन्याला त्याच दिवशी रिचार्ज नूतनीकरण करू शकतील.
डेटा न वापरणाऱ्यांना फायदा
मोबाईल रिचार्जमध्ये कॉलिंग, एसएमएस आणि डेटा अशा तिन्ही सुविधा एकत्र दिल्या जात असल्या तरी अनेक ग्राहकांचा डेटा वापर अत्यल्प असतो. अशा ग्राहकांना आता फक्त आवश्यक सेवांसाठी पैसे खर्च करण्याचा पर्याय मिळणार आहे. ट्रायच्या या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांना आपल्या रिचार्ज योजनांमध्ये बदल करावे लागणार असून ग्राहकांना अधिक पर्याय आणि आपल्या वापरानुसार प्लॅन निवडण्याची मुभा मिळणार आहे.