आमदार अपात्रतेचा निर्णय पुन्हा लांबणीवर File Photo
राष्ट्रीय

आमदार अपात्रता प्रकरणाला विधानसभा निवडणुकीपूर्वी मुहूर्त मिळणार?

आमदार अपात्रता निर्णय लांबणीवर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये

शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. सोमवार, मंगळवारनंतर बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात होते. मात्र तिन्ही दिवस एक अन्य प्रकरण दीर्घकाळ चालल्याने आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही. आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख असा सिलसिला सुरू आहे. काही दिवसात या प्रकरणावरील सुनावणीसाठी नवी तारीख दिली जाण्याची शक्यता आहे मात्र ती देखील पुढच्या महिन्यातील असु शकते. लवकरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणाला विधानसभा निवडणुकीपूर्वी मुहूर्त मिळणार का आणि या प्रकरणाचा निकाल लागणार का, अशा चर्चा राजकीय वर्तूळात जोर धरत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणात आतापर्यंत काय काय झाले?

  • १५ जानेवारी २०२४- विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

  • २२ जानेवारी २०२४ शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पहिली सुनावणी, शिंदे गटाच्या सर्व आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली

  • ७ मार्च २०२४- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला आणि विधानसभा अध्यक्षांसमोरील मूळ सुनावणीची कागदपत्रे मागवली

  • २३ जुलै २०२४- राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी पहिली सुनावणी होती मात्र वेळेअभावी होऊ शकली नाही

  • २९ जुलै २०२४- राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली. याच दिवशी अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावली आणि यापुढे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी एकाच दिवशी मात्र स्वतंत्र होणार असे न्यायालयाने सांगितले

  • दरम्यान आणि त्यानंतरही हे प्रकरण ४-५ वेळा सोबत वेळापत्रकात येत गेले मात्र सुनावणी होऊ शकली नाही

येत्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आल्यास निकालाला महत्त्व राहील. त्यापेक्षा उशीर झाल्यास निकालाला महत्त्व राहणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातून या प्रकरणाचा निकाल विधानसभा निवडणुकीपूर्वी यावा, असे ठाकरे गटासह शरद पवार गटाला वाटते. दरम्यान, यापूर्वी न्यायालयाने स्पष्ट केले होते की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकाच दिवशी होईल मात्र स्वतंत्र होईल. त्यानुसार आतापर्यंत ८-९ वेळा हे प्रकरण सुनावणीसाठी आले मात्र २-३ वेळाच यावर सुनावणी झाली.

ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाला ५ ते १२ ऑक्टोबर दसऱ्यानिमित्त सुट्टी आहे तर दिवाळीनिमित्त २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत सुट्टी आहे. लगेचच १० नोव्हेंबरला सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत. हे वेळापत्रक पाहता शिवसेना ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकर हवी असल्यास प्रकरणाचे महत्त्व सांगून दोन्ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयासमोर नमूद करावे लागतील, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय सुनावणीसाठी लवकर तारीख देऊ शकते. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची नवी तारीख समजल्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर नमूद करणार असल्याचे समजते. सरन्यायाधीशांच्या निवृत्तीपूर्वी आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातील निकाल येईल, अशा अपेक्षा राजकीय नेत्यांना आहेत. मात्र सलग तारीख पे तारीख मिळत असल्याने खरंच विधानसभा निवडणुकीपूर्वी याबद्दलचा निकाल येईल का याबद्दल अनेक लोक साशंकही आहेत.

विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयात शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लेखी युक्तीवादाची पूर्तता करण्यात आली आहे. आता अंतिम मौखिक युक्तिवाद उरले आहेत. मात्र अजित पवार गट आणि शिंदे गटही विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला आधी हे ठरवावे लागेल, की आमदार अपात्रता प्रकरण नक्की कोणत्या न्यायालयात चालवायचे आणि त्यानंतरच अंतिम मौखिक युक्तिवादाला सुरुवात होईल. मात्र आतापर्यंतची कार्यपद्धती पाहता सर्वोच्च न्यायालयातच या प्रकरणाची सुनावणी होईल, असे दिसते. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह प्रकरणासंदर्भातील निकाल निवडणुकीपूर्वी येण्याची शक्यता दिसत नाही. अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT