MK Muthu
चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र एम. के. मुथू यांचे आज (दि. १९) सकाळी ८ वाजता वृद्धापकाळाने झालेल्या आजारामुळे चेन्नईमध्ये निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव चेन्नईतील इंजमबक्कम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
एम. के. मुथू यांचा जन्म १४ जानेवारी १९४८ रोजी झाला होता. ते करुणानिधी आणि त्यांच्या पहिल्या पत्नी पद्मावती यांचे अपत्य होते. मुथू यांच्या जन्मानंतर काहीच दिवसांत पद्मावती यांचे निधन केवळ २० व्या वर्षी क्षयरोगामुळे झाले होते.
तमिळनाडूमधील राजकारण आणि चित्रपटसृष्टीत प्रभाव टाकणाऱ्या करुणानिधी यांनी सुरुवातीस मुथू यांना आपल्या राजकीय वारसदार म्हणून पाहिले होते. मात्र, एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या वाढत्या प्रभावाला प्रत्युत्तर म्हणून, १९७० च्या दशकात मुथू यांना त्यांनी नायक आणि पार्श्वगायक म्हणून तमिळ चित्रपटसृष्टीत उतरवले.
त्यांनी १९७० च्या दशकात अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात 'अनिया विलाक्कू ', 'पुक्करी' आणि 'पिल्लइयो पिल्लई' यांचा समावेश आहे. यातील 'पिल्लइयो पिल्लई' या चित्रपटाची कथा त्यांचे वडील करुणानिधी यांनीच लिहिली होती. तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी भावाला श्रद्धांजली वाहिली. मुथू यांच्या निधनामुळे, द्रमुक (DMK) पक्षाने आजचे सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द केले आहेत.
मुथू यांचे करिअर काही काळ गाजले असले, तरी ते फार काळ टिकले नाही. वडिलांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी जयललिता यांच्या नेतृत्वाखालील AIADMK मध्ये प्रवेश केला, यामुळे घरातील आणि पक्षातील नातेसंबंध ताणले गेले. मात्र, २००९ मध्ये मुथू यांची प्रकृती खालावल्यावर करुणानिधी आणि मुथू यांच्यात पुन्हा सलोखा झाला. २०१३ मध्ये मुथू यांना हृदयविकाराचा झटका आला होता.