ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या मिझोराममध्ये येत्या 7 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, विद्यमान सत्ताधारी 'मिझो नॅशनल फ्रंट'समोर (एमएनएफ) यावेळी काँग्रेस आणि 'झोराम पीपल्स मुव्हमेंट'ने (झेडपीएम) कडवे आव्हान निर्माण केले आहे. वाढता भ्रष्टाचार, शरणार्थींची वाढती संख्या आणि स्थानिक मुद्द्यांवर इथली निवडणूक केंद्रित झाली आहे. राज्यात विधानसभेच्या 40 जागा असून, त्यातील 25 ते 30 जागा जिंकण्याचा विश्वास मुख्यमंत्री झोरांगथामा यांनी व्यक्त केलेला आहे. गत काही काळात झेडपीएम पक्षाचा प्रभाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर 'झोराम पीपल्स मुव्हमेंट'ला कमी लेखून चालणार नाही, अशी सत्ताधार्यांसमोरील स्थिती आहे.
मुख्यमंत्री झोरांगथामा यांच्यावर जसे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तसे ते काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री ललथनहवला यांच्याविरोधातही आहेत. दोन्ही नेत्यांबद्दल मिझोरामच्या जनतेत संशयाची भावना आहे. मात्र असे असले तरी सध्याच्या स्थितीत 'एमएनएफ'चे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक-आर्थिक विकास धोरणाअंतर्गत (एसईडीपी) विविध योजना राबविणे, शरणार्थींची समस्या सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार हे मुद्दे झोरांगथामा यांच्या कामी येत आहेत. आसामसोबतचा सीमावाद तसेच अमली पदार्थांचा वाढता वापर हा मिझोरामच्या द़ृष्टीने चिंतेचा विषय आहे. म्यानमारमधून आलेल्या शरणार्थींची बायोमॅट्रिक माहिती जमा करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने टाळाटाळ चालविलेली आहे. राजकीय चाल म्हणून 'एमएनएफ'च्या या चालढकलीकडे पाहिले जात आहे. मिझोरामच्या शहरी भागात 'झोराम पीपल्स मुव्हमेंट'ची लोकप्रियता वाढली आहे. लालदुहावमा हे या पक्षाचे नेते आहेत. त्रिपुरामध्ये राहत असलेल्या ब्रू जातीच्या लोकांचा समावेश मतदार यादीत करण्याची मागणी होत आहे. हा मुद्दाही निवडणूक प्रचारात दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. भाजपला दोन जागा मिळतील, तर झेडपीएम दहाच्या आत गुंडाळली जाईल, असे मुख्यमंत्री झोरांगथामा यांनी म्हटले असले तरी काँग्रेसला या निवडणुकीत कमी लेखून चालणार नाही. मिझोराममध्ये 'एमएनएफ' आणि भाजप यांची आघाडी आहे. भाजपने या राज्यातील निवडणुकीची धुरा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, नागालँडचे उपमुख्यमंत्री यानथुंगो पॅटन व अनिल अँटनी यांच्याकडे सोपविलेली आहे. अँटनी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र असून, काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मिझोरामच्या गतवेळच्या निवडणूक निकालावर नजर टाकली, तर त्यावेळी 'एमएनएफ'ला 26 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे 'झेडपीएम'ला 8, तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या होत्या. मिझोरामची बरीचशी आर्थिक भिस्त केंद्राच्या मदतीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत भाजप या राज्यात आपला विस्तार करण्यास आतुर आहे. 'एमएनएफ'सहित अन्य पक्षातील नेत्यांना भाजप गळास लावत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष एल. साहिलो यांनी 'एमएनएफ'ला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मागील काही काळात आसाम आणि मिझोराम दरम्यान सीमेवर हिंसक चकमकी झालेल्या आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराचा अप्रत्यक्ष फटकाही मिझोरामला बसत आहे. 70 हजारपेक्षा जास्त शरणार्थी सध्या मिझोराममध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात येत असलेल्या शरणार्थींसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. तिकडे मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मिझो लोकांना एकत्र आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तावंलुईया यांनी केले आहे.