scientist Subbanna Ayyappan : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) माजी महासंचालक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन (वय ७०) यांचा मृतदेह कावेरी नदीच्या पात्रात १० मे रोजी आढळला. म्हैसूरमध्ये पत्नीसह राहणारे डॉ. अय्यप्पन ७ मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती.
डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह शनिवारी, १० मे रोजी श्रीरंगपट्टणातील साई आश्रमाजवळ कावेरी नदीत एक मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. रविवारी हा मृतदेह डॉ. अय्यप्पन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम असून, या प्रकरणी श्रीरंगपट्टण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. अय्यप्पन यांनी १९७५ मध्ये मंगळुरू येथून मत्स्य विज्ञानात पदवी आणि १९७७ मध्ये मत्स्य विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी १९९८ मध्ये बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली हाेती. मत्स्यपालन आणि शाश्वत शेतीतील संशाेधनात त्यांनी भरीव योगदान दिले. वनेश्वरमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अॅक्वाकल्चर (CIFA) आणि मुंबईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (सीआयएफई) चे संचालक म्हणून काम पाहिले. ते हैदराबादमधील राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (एनएफडीबी) चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते.
भारतातील 'नील क्रांती'चे ( ब्लू रेव्होल्यूशन ) शिल्पकार अशी डॉ. अय्यप्पन यांची ओळख होती. समुद्र, मासेमारी आणि जलसंपत्तीमध्ये त्याचे संशोधन होते. त्यांच्या संशोधनामुळे देशातील मासे पालन आणि मासेमारी पद्धतीत बदल झाला. त्यांच्या कार्यामुळे भारतातील ग्रामीण उपजीविका उंचावणाबरोबरच मासेमारीतील उत्पादकतेमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यांचे संशोधनातील योगदानाची दखल घेत २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागात (डीएआयई) सचिव म्हणूनही काम केले. त्यांनी राष्ट्रीय चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी मान्यता मंडळ (एनएबीएल) चे अध्यक्षपद भूषवले. इंफाळमधील केंद्रीय कृषी विद्यापीठ (सीएयू) चे कुलगुरू म्हणून काम पाहिले हाेते. डॉ. अय्यप्पन यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.