अनिल साक्षी
जम्मू : काश्मीरमधील फुटीरवादी राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सचा अंत झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण काश्मीरचे प्रमुख धर्मगुरू आणि विभाजनवादी नेते मीरवाइज उमर फारूक यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या अधिकृत आणि व्हेरिफाईड एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून ‘चेअरमन, ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स’ हे पदनाम हटवले आहे.
हा बदल गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावर चर्चेदरम्यान लक्षात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी केलेल्या पोस्टमध्ये मीरवाइज यांनी या निर्णयामागची कारणे स्पष्ट केली. त्यानुसार अधिकार्यांकडून त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये बदल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, कारण हुर्रियत कॉन्फरन्समधील सर्व घटक संघटना - ज्यात त्यांची स्वतःची अवामी अॅक्शन कमिटीही समाविष्ट आहे - यांना यूएपीए अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हुर्रियत कॉन्फरन्स आता अधिकृतपणे बंदी घातलेली संघटना ठरली आहे.
मीरवाईज यांनी स्पष्ट केले की, हा बदल न केल्यास त्यांचे एक्स अकाऊंट बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. एक्स हे माध्यम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि काश्मीरशी संबंधित मुद्द्यांवर विचार मांडण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मीरवाईज यांनी ‘चेअरमन’ हे पदनाम हटवणे ही घटना काश्मीरमधील विभाजनवादी चळवळीच्या अस्तास लागण्याचे प्रतीक मानले जात असून, हुर्रियत कॉन्फरन्सच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मीरवाईज यांच्या या निर्णयामुळे काश्मीरमध्ये एकेकाळी प्रभावी असलेल्या फुटीरवादी नेतृत्वाच्या ताकदीत मोठी घट झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या एक्स प्रोफाईलमधील ‘बायो’ विभागात बदल करण्यात आला असून, आता त्यामध्ये फक्त त्यांचे नाव आणि ठिकाण एवढीच प्राथमिक माहिती आहे. मीरवाईज यांचे एक्सवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला, अवामी अॅक्शन कमिटीवर सरकारने बंदी घातली होती. त्याविरोधात मीरवाईज यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.
द़ृष्टिक्षेपात हुर्रियत कॉन्फरन्स
स्थापना 1993 मध्ये काश्मीरमधील सशस्त्र संघर्षाला शांततामय राजकीय
पर्याय देणे आणि आंदोलनांमध्ये समन्वय साधणे हा संघटनेचा उद्देश
या आघाडीत एकूण 23 राजकीय, अर्ध-राजकीय आणि सामाजिक
संघटनांचा सहभाग
जम्मू-काश्मीर प्रश्नावर तोडग्यासाठी भारत, पाकिस्तान आणि जम्मू-
काश्मीरचे प्रतिनिधी यांच्यात त्रिपक्षीय चर्चा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांची
अंमलबजावणीची मागणी ही संघटना करत होती.
मीरवाईज उमर फारुक यांचा प्रवास
मीरवाईज उमर फारूक हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. संघटनेत फुटीनंतर ते त्यांच्या गटाचे प्रमुख म्हणून सक्रिय राहिले. त्यांच्या वडिलांची माजी मीरवाइज मौलवी मोहम्मद फारूक यांची 21 मे 1990 रोजी काश्मीरमध्ये निवासस्थानी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या वेळी उमर फारूक विद्यार्थी होते; मात्र परंपरेनुसार त्यांना मीरवाइज पद दिले गेले आणि त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले.