मिरगपूर देशातील सर्वात सात्त्विक गाव. Pudhari File Photo
राष्ट्रीय

मिरगपूर देशातील सर्वात सात्त्विक गाव

पुढारी वृत्तसेवा

सहारनपूर (उत्तर प्रदेश); वृत्तसंस्था : गेल्या 500 वर्षांपासून गावात कुणीही दारू, गांजा, चरसच काय, तंबाखू, सिगारेट आदी स्वरूपाचे व्यसनही कुणाला नाही. विनयभंग, बलात्कार असा एकही गुन्हा या गावात कुणावरही दाखल झालेला नाही. गावाचे नाव आहे मिरगपूर... देवबंदपासून अवघ्या 8 कि.मी.वर हे गाव आहे.

‘इंडिया बुक’मध्ये या गावाचे नाव आधीच नोंदवले गेले असून, आता ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये या गावाची नोंद झाली आहे. काली नदीच्या काठावर वसलेले मिरगपूर गाव 10 हजार लोकसंख्येचे आहे. एकाही दुकानात मद्य विक्री होत नाही. कांदा, लसणासह 26 प्रकारचे तामसिक पदार्थ गावात निशिद्ध मानले जातात.

सहारनपूर जिल्हा प्रशासनाकडूनही नशामुक्त गाव म्हणून मिरगपूरचा गौरव झालेला आहे. धूम्रपानरहित गाव या श्रेणीतही मिरगपूरचा समावेश झालेला आहे. गावाच्या वेशीवरील बाबा फकीरदास मंदिरातील महंत कालुदास सांगतात, सतराव्या शतकात पुष्कर (राजस्थान) येथील सिद्ध पुरुष बाबा फकीरदास यांनी याच गावात तपश्चर्या केली होती. गावाला निरोप देताना गावकर्‍यांकडून नशा आणि मांसाहार न करण्याचे, महिलांचा आदर करण्याचे वचन त्यांनी घेतले होते. तेव्हापासून गाव हे वचन पाळत आलेले आहे.

लग्नानंतर मात्र मुली गावप्रतिज्ञेतून मोकळ्या

गाव क्षत्रिय गुर्जरबहुल असल्याने गावातील मुली लग्न करून सासरी जातात तेव्हा त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचण येऊ नये म्हणून त्यांना गावाच्या प्रतिज्ञेतून (विशेषत: मांसाहार निशिद्ध असल्याच्या) मुक्त केले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT