शाहजहांपूर : उत्तर प्रदेशात दोन महिलांनी लग्न केले होते. त्यातील सरिता सिंह नावाच्या महिलेने स्वतःचे लिंगपरिवर्तन करून शरद सिंह असे नाव धारण केले. आता या जोडप्याने एका अपत्यास जन्म दिला आहे.
शरद सहायक शिक्षक आहे. शाहजहांपुरातील जैन हॉस्पिटलमध्ये ही प्रसूती झाली. बाळ आणि बाळंतीण दोघेही उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाहजहांपूर जिल्ह्यातील खुदागंज तालुक्यातील नवादा गावातील सरिता सिंहने पिलीभीत जिल्ह्यातील देवहा गावातील सविता सिंहशी गेल्या वर्षी लग्न केले होते.
सरिता सिंहने लिंग परिवर्तनाची प्रक्रिया २०२१-२२ मध्ये सुरू केली होती. लखनौमधील हार्मोन थेरपीनंतर सरिताला दाढी आली. तिच्या आवाजात बदल झाला. त्यानंतर २०२३ मध्ये शस्त्रक्रिया करून तिचे गर्भाशय काढले आणि लिंगप्रत्यारोपण केले.
शाहजहांपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी उमेशकुमार यांनी लिंगबदल केल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर शरद याने आपली मैत्रीण सविता हिच्याशी लग्न केले. पिता झाल्यानंतर शरद म्हणाला, माझ्या जीवनातला हा अपार असा आनंद आहे. तो शब्दांत मी व्यक्त करू शकत नाही. विज्ञानाच्या चमत्काराने हे अशक्य ते शक्य झाले आहे. शरद हा प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक आहे.