India Action against Pakistani YouTube channels
दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत १६ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पाकिस्तानच्या बंदी घातलेल्या त्या १६ चॅनेलची लिस्ट जारी केली आहे.
गृहमंत्रालयाच्या शिफारशीवरून डॉन न्यूज (Dawn News), सामा टीव्ही (Samaa TV), एआरवाय न्यूज (ARY News), जिओ न्यूज (Geo News) यासह अन्य चॅनेल्सवर ही बंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनेलचा देखील समावेश आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅनेल्सकडून भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांविरुद्ध भडकाऊ, धार्मिक तेढ वाढवणारी, खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या या प्रकारांवर लगाम घालण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय सरकारने स्पष्ट केले आहे की, देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि सामाजिक सलोख्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या डिजिटल प्रचाराला मुळापासून थांबवले जाईल. या कारवाईनंतर अधिकृत यंत्रणांकडून पुढील पावले आणि तपासाच्या प्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयांने दिली आहे.