नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव वाढत असताना भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत देशांतर्गत मागणी आणि स्थिर आर्थिक निर्देशकांच्या आधारावर ठाम उभी आहे. ऑटो विक्रीपासून जीएसटी संकलनापर्यंत अनेक महत्त्वाच्या संकेतांकांमध्ये सकारात्मकता दिसत असली, तरी मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे निर्माण होणारे धोके आणि स्टॅगफ्लेशन (मंद वाढ आणि उच्च महागाई) ची शक्यता यामुळे पुढील काळात अर्थव्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. जागतिक स्तरावरील मोठी वित्तीय सेवा कंपनी असलेल्या मॉर्गन स्टॅनलेने याबाबतचा इशारा दिला आहे.
देशांतर्गत पातळीवर अर्थव्यवस्थेला चालना देणारे अनेक घटक मजबूत दिसत आहेत. ऑटोमोबाईल विक्रीत वाढ, बँक कर्जवाटपातील वाढ आणि जीएसटी संकलनातील सातत्य हे अर्थव्यवस्थेतील स्थैर्य दाखवतात. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सुधारणा दिसून येत असताना, सेवा क्षेत्रात किंचित मंदीची चिन्हे आहेत. कंपन्यांच्या कर्मचारी खर्चात वाढ झाली असून, त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत असल्याचे संकेत आहेत. एसआयपीतील गुंतवणूक वाढत असून, व्यावसायिक क्षेत्राकडे निधीचा प्रवाह चांगला आहे. यामुळे उद्योगांना कर्ज आणि भांडवल उपलब्ध होत आहे. शिवाय डिसेंबर 2025 तिमाहीत कंपन्यांची महसूल वाढ स्थिर राहिली आहे.
मध्यपूर्वेतील तणाव धोकादायक
भारताची अर्थव्यवस्था बाह्य घटकांपासून पूर्णपणे सुरक्षित नाही. विशेषतः मध्यपूर्वेतील तणावामुळे ऊर्जा किमतींमध्ये चढ-उतार होऊ शकतो. भारताच्या निर्यातीपैकी सुमारे 15 टक्के हिस्सा या प्रदेशात जातो. देशाच्या एकूण रेमिटन्सपैकी (परदेशात काम करणार्यांनी कुटुंबीयांना पाठवलेले पैसे) सुमारे 38 टक्के हिस्सा याच भागातून येतो. या भागातील अस्थिरता भारताच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम करू शकते.
आरबीआयसमोर आव्हान
जर महागाई वाढली, तर आरबीआयसमोर कठीण पर्याय असतील. व्याजदर वाढवल्यास महागाई नियंत्रणात राहील पण वाढ मंदावेल आणि व्याजदर कमी ठेवल्यास वाढ टिकेल, पण महागाई वाढेल. हीच द्विधा स्थिती म्हणजे स्टॅगफ्लेशनची सुरुवात मानली जाते. तथापि, परकीय चलन साठा सुमारे 710 अब्ज डॉलरचा परकीय चलनसाठा, मजबूत बँकिंग प्रणाली आणि आर्थिक मुलभूत घटक स्थिर असणे हे भारताला बाह्य धक्क्यांपासून काही प्रमाणात संरक्षण देतात.
भारताला धोका कुठून निर्माण होऊ शकतो?
तेलाच्या किमतीत वाढ
पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर 115 प्रतिबॅरलच्या वर गेले आहेत. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे तेल महाग झाल्यास महागाई वाढते, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढतो.
रुपयाची घसरण
भारतीय रुपया अलीकडे डॉलरच्या तुलनेत 94.88 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 1 महिन्यात 3 टक्केपेक्षा जास्त घसरण झाली आहे. 12 महिन्यांत सुमारे 10 टक्के घसरण झाली आहे. कमकुवत रुपयामुळे आयात महाग होते आणि महागाईवर दबाव वाढतो.
परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी
मार्च 2026 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 12 अब्ज डॉलर रक्कम भारतीय शेअर बाजारातून काढून घेतली. सन 2025-26 कालावधीत एकूण 20 अब्ज डॉलर बाहेर पडलेली रक्कम. जागतिक अस्थिरतेत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय (जसे यूएस डॉलर) निवडतात. यामुळे भारतीय बाजार आणि चलनावर दबाव येतो.
स्टॅगफ्लेशन म्हणजे काय?
सध्या ‘स्टॅगफ्लेशन’ हा शब्द सोशल मीडियापासून आर्थिक चर्चांपर्यंत सर्वत्र चर्चेत आहे. स्टॅगफ्लेशन म्हणजे आर्थिक वाढ मंदावते (जीडीपी वाढ कमी होते), बेरोजगारी वाढते, महागाई सतत उच्च पातळीवर राहते, नोकर्या कमी आणि खर्च वाढतो असा दुहेरी फटका बसतो (साधारणतः मंदीच्या काळात महागाई कमी होते; पण स्टॅगफ्लेशनमध्ये दोन्ही समस्या एकत्र दिसतात). तथापि, सध्या भारत स्टॅगफ्लेशनपासून दूर आहे.