नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन झाल्याने देशातील आणि जगातील विमान उड्डाणे, सुपरमार्केट, बँकिंग सेवांवर परिणाम झाला. दिल्ली विमानतळावर प्रशासनाला आणि प्रवाशांना याचा फटका बसला. या सर्व्हर डाऊनमुळे भारतातील जवळजवळ सर्व हवाई वाहतूक कंपन्यांनी प्रवाशांना या सर्व्हर डाऊनमुळे विमानांना विलंब होत असल्याचे ‘एक्स’वरुन कळवले. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी देशातील विमानतळ आणि विमान वाहतूक कंपन्यांना नागरी उड्डयान मंत्री राम मोहन नायडूंनीही निर्देश दिले.
नागरी उड्डाण मंत्री, राममोहन नायडू म्हणाले की, विमानतळ आणि विमान कंपन्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी अतिरिक्त वेळ बसण्याची परवानगी, पाणी आणि भोजन दिले जावे, असे निर्देशही त्यांनी दिल्याचे सांगितले. या संबंधी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही सूचना जारी केल्या.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, जागतिक आउटेजच्या संदर्भात मायक्रोसॉफ्टच्या संपर्कात मंत्रालय आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न जारी आहेत. सरकारच्या संगणक आपात्कालीन प्रतिक्रिया टीमनेही यासंबंधी सूचना जारी केल्या असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.