पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्क झुकरबर्ग यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मेटा इंडियाने आज (दि. १५) माफी मागितली आहे. झुकरबर्ग यांचे निवडणुकीबाबातचे विधान हे "अनवधानाने झालेली चूक" असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
संसदीय समिती फेसबुकची मूळ कंपनी मेटाला समन्स बजावणार आहे, अशी माहिती आयटी आणि कम्युनिकेशन प्रकरणांवरील संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी मंगळवारी X पोस्टच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "लोकसभा निवडणुकीबाबत चुकीच्या माहितीसाठी माझी समिती मेटाला समन्स बजावेल. कोणत्याही लोकशाही देशात चुकीची माहिती देशाची प्रतिमा मलिन करते. या चुकीबद्दल त्या संघटनेला भारतीय संसदेची आणि येथील लोकांची माफी मागावी लागेल."
जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये मार्क झुकरबर्ग म्हणाले होते की, सरकारांचा हा पराभव दर्शवितो की कोविड महामारीनंतर लोकांचा विश्वास कमी झाला आहे. वाढती महागाई, साथीच्या आजाराशी संबंधित आर्थिक धोरणे आणि सरकारांनी कोविड-१९ ला कसे हाताळले यामुळे लोकांचा विश्वास कमी झाला आहे, असेही ते म्हणाले होते.
आयटी आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही X वर पोस्ट करताना Meta ला टॅग केले. त्यांनी लिहिले की, या प्रकरणात, अश्विनी वैष्णव यांनी आधीच मार्क झुकरबर्ग यांना उत्तर दिले होते. त्यांनी X वर पोस्टमध्ये लिहिले की, "जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतात २०२४ मध्ये निवडणुका झाल्या ज्यामध्ये ६४ कोटी लोकांनी भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या एनडीए सरकारवर भारतातील जनतेने विश्वास दाखवला. कोविडनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह जगातील बहुतेक सत्ताधारी सरकारे पराभूत झाली आहेत, हा मार्क झुकरबर्गचा दावा चुकीचा आहे."