नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा
समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीपासून स्वतःला दूर केले आहे. या समितीचे नेतृत्व भाजप खासदार निशिकांत दुबे करत होते. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, जया बच्चन आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखालील कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकासविषयक संसदीय स्थायी समितीच्या सदस्या असतील.
तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी सपा खासदार जया बच्चन यांच्या जागी कम्युनिकेशन आणि माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय पॅनेलमध्ये स्थान घेतले आहे. दरम्यान, राज्यसभा सदस्य ए. ए. रहिम, आर गिरीराजन, जे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय समितीचे सदस्य होते, ते आता गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारांवरील संसदीय पॅनेलचे सदस्य बनले आहेत.