मेहली मिस्त्री हे भारतीय कॉर्पोरेट जगतातील प्रसिद्धीपासून दूर राहणारे व्यक्तिमत आहे. दिवंगत सायरस मिस्त्री यांचे ते चुलत बंधू आणि पल्लोनजी मिस्त्री यांच्या भावाचे चिरंजीव आहेत. रतन टाटा यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख आहे.
Mehli Mistry voted out from Tata Trusts
मुंबई : रतन टाटा यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असणारे मेहली मिस्त्री (Mehli Mistry) यांना टाटा ट्रस्ट्समधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या मतदानात बहुतांश विश्वस्तांनी त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या विरोधात मतदान केले. त्यांना सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट या दोन्ही बोर्डांवरून पायउतार व्हावे लागले. या दोन्ही ट्रस्टचा टाटा सन्समधील हिस्सा तब्बल ६६% आहे. नेहमीच पडद्याआड राहून मोठी भूमिका बजावणारे मेहली मिस्त्री हे टाटा ट्रस्टमधून बाहेर पडणे हे टाटा समूहाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मेहली मिस्त्री हे भारतीय कॉर्पोरेट जगतातील प्रसिद्धीपासून दूर राहणारे;पण उद्योगांमध्ये आपली खोल छाप सोडणारे व्यक्तिमत आहेत. दिवंगत सायरस मिस्त्री यांचे ते चुलत बंधू आणि पल्लोनजी मिस्त्री यांच्या भावाचे चिरंजीव आहेत. त्यांचे आडनाव शापूरजी पल्लोनजी समूहाशी जोडलेले असले तरी, त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला. ते एम. पल्लोनजी ग्रुपचे संचालक आहेत. हा ग्रुप वाहतूक व पुरवठा व्यवस्था, पेंटिंग, इन्शुरन्स आणि शिपिंगसारख्या अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे आजवर त्यांनी कधीही मुलाखत दिली नाही. ते नेहमी सार्वजनिक क्षेत्रापासून लांब राहिले आहे.
मेहली मिस्त्री हे रतन टाटा यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. रतन टाटांच्या मृत्युपत्राचे कार्यन्वयक (Executor) देखील आहेत. रतन टाटांची अलिबाग येथील मालमत्ता आणि त्यांच्या खासगी संग्रहातील काही वस्तूंचा वारसाही त्यांना मिळाला आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले तेव्हा, मेहली मिस्त्रींनी रतन टाटांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना कठीण काळात भक्कम आधार दिला होता. त्यांच्या निर्णयामुळे आणि विवेकबुद्धीमुळे त्यांना नेहमी 'टाटा कुटुंबातील विश्वासातील सल्लागार' मानले गेले आहे.
रिपोर्टनुसार, मेहली मिस्त्री यांनी विजय सिंह यांच्या टाटा सन्सच्या बोर्डातील पुनर्नियुक्तीला विरोध केला. या विरोधामुळे ट्रस्ट्समध्ये २-४ अशी थेट विभागणीच झाली. या वादातून मेहली मिस्त्री आणि नोएल टाटा यांच्यातील मतभेद वाढत गेले, असे मानले जात आहे. अखेरी टाटा ट्रस्ट्सच्या बोर्डाने मेहली मिस्त्री त्यांच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. असेही मानले जात आहे की, टाटा ट्रस्ट्सची पुढील दिशा आणि नेतृत्वात होणाऱ्या मोठ्या बदलांचे हा संकेत आहे.