राष्ट्रीय

Honeymoon Murder : मेघालय ‘हनीमून हत्याकांड’ प्रकरणात सोनम रघुवंशीला जामीन मंजूर, प्रियकराच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट

७९० पानांच्या दोषारोपपत्रानंतर सोनम तुरुंगाबाहेर

पुढारी वृत्तसेवा

Meghalaya honeymoon murder case Sonam Raghuvanshi bail

शिलाँग : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरमधील व्यापाऱ्याच्या हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सोनम रघुवंशी या महिलेला मंगळवारी (दि. २८) मेघालय न्यायालयाने जामीन मंजूर केला. या खळबळजनक हत्याकांडात विशेष तपास पथकाने (SIT) सुमारे ७९० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, त्यात सोनमसह तिचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि अन्य तीन भाडोत्री मारेकऱ्यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

२०२५ मध्ये इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी विवाहासाठी मेघालयात आले होते. २० मे रोजी हे दाम्पत्य गुवाहाटी आणि शिलाँगला पोहोचले, मात्र २३ मे पासून ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. शोधमोहिमेच्या १० दिवसांनंतर, २ जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथील एका खोल दरीत राजा रघुवंशी यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला होता. या गुन्ह्यात तिने आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी या तीन मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. या सर्वांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

पोलिस प्रशासनाची भूमिका

पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक स्यिएम यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला असला तरी, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा कायद्यानुसार पाठपुरावा सुरूच ठेवतील."

हत्येमागचे कारण: प्रेमसंबंध आणि विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, सोनमचे राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध होते, ज्याला तिच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. कुटुंबीयांनी तिचे लग्न राजा रघुवंशी यांच्याशी लावून दिले. यामुळे संतप्त झालेल्या सोनमने लग्नापूर्वीच आपल्या कुटुंबाला गंभीर परिणामांची चेतावणी दिली होती. अखेर आपल्या प्रियकरासोबत मिळून तिने हनिमूनदरम्यान पतीचा काटा काढण्याचा कट अंमलात आणला.

एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३(१), २३८(अ) आणि ६१(२) अन्वये सोनम आणि तिच्या साथीदारांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

घटनाक्रम :

  • ११ मे: इंदूरमध्ये राजा आणि सोनमचा विवाह संपन्न झाला.

  • २० मे: दाम्पत्य हनिमूनसाठी शिलाँगला पोहोचले आणि त्यानंतर सोहराकडे रवाना झाले.

  • २३ मे: 'नोग्रियत होमस्टे'मधून त्यांनी चेक-आउट केले. याच दिवशी वेई सावदोंग धबधब्याजवळ राजाची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

  • २६ मे: दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार; मोठी शोधमोहीम सुरू.

  • ३१ मे: गोल्डन पाइन्स ढाब्याजवळ एक बेवारस स्कूटर सापडली.

  • २ जून: अर्लीयांग रियत कुनोंगरीम येथील दरीतून राजाचा मृतदेह हस्तगत.

  • ८-११ जून: उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून सोनम, राज कुशवाह आणि तीन मारेकऱ्यांना अटक.

  • २२-२५ जून: पुरावे नष्ट केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातून अन्य तिघांना अटक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT