Meerut Death Sentence उत्तर प्रदेशातील मेरठ येथील कुप्रसिद्ध सर्पदंश प्रकरणात, न्यायालयाने अमित कश्यपची पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मेरठ येथिल बहसूमा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या अकबरपुरा सादात या गावात गेल्या वर्षी एप्रील २०२५ मध्ये हे हत्याकांड घडले होते.
हत्येप्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी दोघांनाही दोषी ठरवण्यात आले होते. अमितचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे वृत्त होते, परंतु शवविच्छेदनात गुदमरून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. कोर्टाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ असल्याचे म्हणत या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. ७ ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण् झाली होती. मेरठ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी ही शिक्षा सुनावली.
पत्नीही पतीची अंर्धांगिनी, सावित्रीने यमराजाकडून पतीचे प्राण परत आणले होते
हा निर्णय देण्यापूर्वी कोर्टान पौराणिक सावित्रीचा दाखला देत म्हटले की, पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते सावित्रीच्या पतीचे निधन झाले त्यावेळी तीने यमराजाशी संर्घष करत आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. त्यामुळे हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असून पतीच्या हत्येचा असा बनाव रचल्याबद्दल फाशी सुणावली आहे.
मेरठच्या या बहुचर्चित प्रकरणात पत्नी रविता आणि तिचा शेजारी अमरदीप यांच्यात अनैतिक संबंध होते. या वादामुळे दोघांनी अमित कश्यपला मार्गावरून हटवण्याचा कट रचला होता. 12 एप्रिल 2025 रोजी अमित त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला, त्यानंतर हे प्रकरण शांत करण्यासाठी विचित्र युक्ती अवलंबण्यात आली.
बिनविषारी साप सोडला व प्रकरण अंगलट आले
अमित कश्यप याला पत्नी रविता व प्रियकर अमरदीप या दोघांनी गळा दाबून मारले. कटाचा एक भाग म्हणून मृत्यू नैसर्गिक वाटावा म्हणून अमितच्या अंगाखाली एक साप सोडण्यात आला जेणेकरून सर्वांना वाटेल की त्याचा मृत्यू साप चावल्याने झाला. सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, साप पकडणाऱ्या तज्ज्ञांनी हा साप बिनविषारी असल्याचे जाहीर केले होते. तपासाची दिशाभूल करण्यासाठी आणि पुरावे लपवण्यासाठी आरोपींनी ही धूर्त खेळी खेळली होती.
मेरठ येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-१२ यांच्या न्यायालयात रविता आणि अमरदीप यांच्या शिक्षेच्या सुनावणीदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दोघांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. मृत अमितची आई मुनेश आणि भाऊ देखील न्यायालयात उपस्थित होते. शिक्षेच्या सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी दोन्ही दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्याने सांगितले की, हे प्रकरण मुस्कान आणि साहिल हत्याकांडासारखेच आहे, ज्यामध्ये पत्नीने आपल्या प्रियकराच्या संगनमताने पतीची हत्या केली होती.
न्यायाधीशांनी विचारले- शिक्षेवर तुमचे काही म्हणणे आहे का?
युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी रविता आणि अमरदीप यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विचारले की त्यांना मृत्युदंड किंवा जन्मठेपेच्या शिक्षेबाबत काही म्हणायचे आहे का. मात्र, दोघांनीही यावर काहीही बोलण्यास नकार दिला. यानंतर न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.
सुनावणीदरम्यान रविताने आपला गुन्हा कबूल केला होता. रविताने सांगितले होते की, अमित झोपला असताना तिने त्याचे हात व तोंड धरले होते, तर तिचा प्रियकर अमरदीप याने अमितचा गळा दाबून खून केला होता.रविताच्या म्हणण्यानुसार अमरदीपने सापाचीही व्यवस्था केली होती. हत्येनंतर सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी एक साप बेडवर सोडण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात गुदमरल्याने मृत्यू झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले.