नवी दिल्ली; पीटीआय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षांत 75 हजार नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याच्या दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) एमबीबीएसच्या 10 हजार 650 नवीन जागांना मंजुरी दिली आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाची उपलब्धता वाढवण्याच्या व्यापक धोरणाचा हा भाग आहे.
या वाढीसह 41 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची भर पडली असून देशातील एकूण वैद्यकीय संस्थांची संख्या आता 816 झाली आहे. आयोगाचे प्रमुख डॉ. अभिजात शेठ यांच्या माहितीनुसार, पदवीपूर्व जागा वाढवण्यासाठी 170 अर्ज प्राप्त झाले होते. त्यात 41 सरकारी महाविद्यालये आणि 129 खासगी संस्थांचा समावेश होता. यातून एकूण 10 हजार 650 जागांना मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थामधील शैक्षणिक वर्षासाठी एकूण जागांची संख्या 1 लाख 37 हजार 600 होईल.