Maulana Jarjis Ansari Statement Video: मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. झारखंडमधील एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी भगवान श्रीकृष्ण हे मुस्लिम होते आणि ते दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत असत, असा दावा केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संत समाज, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
व्हिडिओमध्ये मौलाना जर्जिस अन्सारी यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहाव्या श्लोकाचा संदर्भ देत, त्यामध्ये वर्णन केलेली ध्यान-साधना ही प्रत्यक्षात नमाजच असल्याचा दावा केला. त्यांनी केवळ भगवान श्रीकृष्णच नव्हे, तर भगवान श्रीराम यांनीही इस्लामच्या शिकवणीचे पालन केल्याचा दावा केला.
या वक्तव्यानंतर संत समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक संतांनी हे विधान सनातन धर्माच्या श्रद्धांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे. धार्मिक भावना दुखावण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, काही हिंदू संघटनांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मौलानाविरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनीही या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत ते बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.
माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 23 जून 2026 रोजी झारखंडमध्ये झालेल्या एका धार्मिक सभेतील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मौलाना जर्जिस अन्सारी हे उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असून, यापूर्वीही त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ते चर्चेत आले होते.
ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीच्या वादावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मौलानांच्या वक्तव्यामुळे या विषयावरील चर्चा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.