नवी दिल्ली : निरोप समारंभाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं ते भावनिक आणि गंभीर वातावरण. पण दिल्लीतील एका गणिताच्या शिक्षकाने ही परंपरा मोडीत काढत, आपल्या धमाकेदार नृत्याने या सोहळ्याला अक्षरशः ऊर्जेचा डोस दिला. नरेश कौशिक नावाच्या या शिक्षकांनी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या गाण्यावर हुक स्टेप्स इतक्या आत्मविश्वासपूर्वक आणि सहज सादर केल्या की, उपस्थितांनी जल्लोष केला. त्यांच्या या अविस्मरणीय परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नरेश यांना नेटक-यांनी 'रॉकस्टार' म्हणून डोक्यावर घेतले आहे.
नरेश कौशिक यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे आणि तो क्षणार्धात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये कौशिक सर मंचावर उत्साही दिसत आहेत. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून, ते गाण्याच्या तालावर अचूक थिरकत असल्याचे आपल्याला पहायला मिळते.
उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि टाळ्यांचा कडकडाट हेच दर्शवतो की त्यांनी आपल्या नृत्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांचा आत्मविश्वास आणि 'परफॉर्मन्स' संपवण्याची खास शैली पाहून सगळेच प्रभावित झाले. अनेक पाहुणे त्यांच्यासोबत टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवताना दिसतात.
कौशिक सर फक्त गणिताचे शिक्षक नाहीत, तर ते त्यांच्यातील या अप्रतिम कलागुणांमुळे आता सोशल मीडियावरही चर्चेत आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे सुमारे ८,००० फॉलोअर्स आहेत. त्यांनी आपल्या बायोमध्ये स्वतःचा उल्लेख 'डान्सिंग डॅड' असा केला आहे.
या शिक्षकाने सिद्ध केले की वय, व्यवसाय आणि स्टेजचा ताण यापेक्षा तुमचा आनंद आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. सोशल मीडियावर या व्हिडिओला मिळालेल्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांच्या या डान्सचे व्हिडिओ आणि कमेंट्स सध्या खूप व्हायरल होत आहेत. एका शिक्षकाने आपली कला इतक्या आत्मविश्वासाने सादर करणे आणि उपस्थितांना आनंद देणे, यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.