पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभमेळ्यात (Maha Kumbh 2025) भाविकांची गर्दी वाढतच आहे. महाकुंभमेळ्यातील गर्दी पाहून प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारी म्हणून प्रयागराज संगम रेल्वे स्थानक १४ फेब्रुवारीपर्यंत बंद केले आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे भाविकांना त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी वेळेवर पोहोचता आलेली नाही. गर्दीमुळे प्रयागराज संगम रेल्वे स्थानकही शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील मैहर येथील पोलिसांच्या माहितीनुसार, प्रयागराजकडे जाणे अशक्य झाले आहे. कारण तिथे २०० ते ३०० किमी वाहतूक ठप्प झाली आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या मार्गांवर शेकडो किलोमीटर लांब वाहनांचा रांगा लागल्या आहेत. यामुळे महाकुंभमेळ्याला जाणारे हजारो भाविक महामार्गांवर अडकून पडले आहेत. दरम्यान, १३ जानेवारी रोजी सुरू झालेल्या महाकुंभात आतापर्यंत ४३ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश सीमेजवळील रेवाच्या चाकघाट येथे २५० किमीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. “जबलपूरच्या आधी १५ किमी वाहतूक ठप्प झाली आहे. प्रयागराजला पोहोचण्यासाठी अजून ४०० किमी अंतर बाकी आहे. "कृपया महाकुंभमेळ्यासाठी येण्यापूर्वी वाहतुकीची परिस्थिती जाणून घ्या," अशी विनंती एका प्रवाशाने सोशल मीडियावरून केली आहे.
या पाश्वूभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “प्रयागराज येथील महाकुंभात अडकलेल्या लाखो भाविकांसाठी तातडीने आपत्कालीन व्यवस्था करायला हवी. वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या भुकेल्या, तहानलेले आणि थकलेल्या भाविकांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहायला हवे. सामान्य भाविक माणूस नाही का?” असा सवाल त्यांनी केला आहे.