Andaman Sea Gas Reserve | अंदमान समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा महासाठा 
राष्ट्रीय

Andaman Sea Gas Reserve | अंदमान समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा महासाठा

इंधन टंचाईत भारताला जॅकपॉट; ‘समुद्र मंथन मोहिमे’चे मोठे यश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर इंधन टंचाईचे भयावह संकट उभे ठाकलेले असताना आता ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने भारताला मोठा जॅकपॉट लागला असून, अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे. यामुळे भविष्यकाळात भारत इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटलाच करू शकतो.

ऑईल इंडिया लिमिटेडने अंदमान समुद्रात नैसर्गिक वायुसाठ्याचा शोध लावला आहे. पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ही महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, हा शोध भारताच्या खोल समुद्री संशोधन मोहिमेला नवी दिशा देईल. यापूर्वी २०२५ मध्ये ‘श्री विजयपूरम-२’ विहिरीतही वायुसाठ्याचा शोध लागला होता. त्यात ८७ टक्के मिथेन आढळला होता. तो व्यावसायिकदृष्ट्या उच्च दर्जाचा मानला जातो. या दोन्ही विहिरींमधील यशस्वी शोधांमुळे अंदमान द्वीपसमूहाला ‘ऊर्जेचे महासागर’ म्हणून ओळखले जात आहे.

‘समुद्र मंथन मिशन’चा भाग

हे संशोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘समुद्र मंथन मिशन’अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश खोल समुद्री भागातील खनिज आणि ऊर्जा संसाधनांचा शोध घेणे हा आहे. हा शोध अजून प्राथमिक टप्प्यात आहे. पूर्ण व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यास काही वर्षे लागू शकतात. तरीही, हा भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ऊर्जा सुरक्षा धोरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास मंत्री पुरी यांनी व्यक्त केला आहे.

आयातीवरील अवलंबित्व घटणार

भारत सध्या नैसर्गिक वायूचा मोठा आयातदार देश आहे. या नव्या शोधामुळे देशांतर्गत उत्पादन वाढवून आयातीवर अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. सरकारचा उद्देश २०३० पर्यंत ऊर्जा मिश्रणात गॅसचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत वाढवणे आहे. सध्या ते सुमारे ६-७ टक्के आहे. अंदमान समुद्रात अंदाजे ३७१ मिलियन टन हायड्रोकार्बन संसाधने असू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, व्यावसायिक उत्पादनासाठी अजून चाचण्या आणि पायाभूत सुविधा विकसित करणे गरजेचे आहे.

आव्हानात्मक खोदकामाला मोठे यश

ऑईल इंडिया कंपनीने अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे पंधरा किलोमीटरवर ‘श्री विजयपूरम-३’ नावाची अन्वेषण विहीर खोदण्यास सुरुवात केली. जेव्हा अभियंत्यांनी आधुनिक यंत्रसामग्री वापरून समुद्रतळातून १,९०० मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत आव्हानात्मक खोदकाम केले आणि तेथे दिसणारे दृश्य पाहून शास्त्रज्ञ थक्क झाले. विहिरीची प्राथमिक उत्पादन चाचणी केल्यावर हायड्रो कार्बन्सच्या प्रचंड दाबामुळे वायूचा अखंड प्रवाह सुरू झाला. त्यानंतर आणखी खोदकामानंतर, समुद्राच्या मध्यभागी आगीच्या ज्वालांचा अखंड लोळ दिसला. यामुळे भारताने नैसर्गिक वायूचा विशाल साठा शोधल्याचा ठोस पुरावा मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT