ढगफुटीनंतर आलेल्या पुरात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. -
राष्ट्रीय

Uttarakhand Landslide | उत्तराखंडात भूस्खलन; देशाच्या ७० टक्के भागातून ढग गायब

पाकिस्तानकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून मंदावला

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तर भारतातील मैदानी भागात मान्सूनची गती मंदावली असताना जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री ढगफुटी झाल्याने अचानक पूर (फ्लॅश फ्लड) आला. या पुरात शेतीचे तसेच नागरी सुविधांचे मोठे नुकसान झाले असून एक महत्त्वाचा रस्ताही वाहून गेला आहे. सुदैवाने जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

तर उत्तराखंडमधील विकासनगर परिसरात मुसळधार पावसामुळे लखवाड जलविद्युत प्रकल्पाजवळ मोठे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत अनेक वाहने आणि प्रकल्पातील यंत्रसामग्री मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली. प्रशासनाने तत्काळ बचाव आणि साफसफाईची मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, देशाच्या सुमारे ७० टक्के भागातून मान्सूनचे ढग जवळपास नाहीसे झाल्याचे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. यामागे पाकिस्तानच्या दिशेने येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या पश्चिमेकडील वाऱ्यांचा मोठा प्रभाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हवामानविषयक संकेतस्थळ ‘ऑल इंडिया वेदर’च्या अहवालानुसार हे कोरडे वारे अरबी समुद्र, मध्य भारत आणि दक्षिण भारतापर्यंत पोहोचले असून त्यामुळे वातावरणातील आर्द्रता कमी झाली आहे. परिणामी, ढगांची निर्मिती कमी होत असून उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता घटली आहे. यामुळे राजस्थान, दिल्ली-एनसीआर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचीच शक्यता असून जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तापमानात वाढ

पावसाने उघडीप दिल्याने मध्य प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये तापमानात वाढ झाली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे शनिवारी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

मैदानी भागात पावसाची उघडीप; डोंगरी भागात पूर

हवामान तज्ज्ञांच्या मते, मैदानी भागात मान्सून कमकुवत झाला असला तरी डोंगराळ प्रदेशात ओलसर वारे पर्वतरांगांना धडकून अल्पावधीत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अचानक पूर, ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत.

विविध राज्यांतील पाऊस

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे गंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून त्रिवेणी संगम परिसरातील पाणी वाढले आहे. उत्तराखंडमधील ऋषीकेश येथेही गंगेची पातळी वाढली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पावसामुळे तापमानात घट झाली असून दाट धुके पसरले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे अनेक रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले. लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाच्या आवारातही पाणी शिरले.

पॅसिफिक महासागरातील प्रणालीकडून आशा

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पॅसिफिक महासागरात सध्या तीन नवीन हवामान प्रणाली विकसित होत आहेत. यापैकी एखादी प्रणाली बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास मान्सूनला पुन्हा बळ मिळू शकते. त्यामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT