Marathi Women Officers Symposium
नवी दिल्ली : विविध राज्यात किंवा देशात काम करताना आपण समृद्ध होतो आणि आपल्या राज्याची, आपल्या संस्कृतीची आणखी घट्ट ओळख आपल्याला होते. याचवेळी बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात आणि काही अनपेक्षित अनुभव येतात, असा सूर "परराज्यातील मराठी महिला अधिकाऱ्यांचे अनुभव" या परिसंवादात उमटला. महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात तपास महासंचालक अनुपमा निळेकर, परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत प्रतिभा पारकर, नागालँडच्या मुख्य निवडणूक अधिकारी भाग्यश्री बाणायत, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत रोहिणी भाजीभाकरे सहभागी झाल्या होत्या. केंद्रीय अर्थ मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत डॉ. क्रांती खोब्रागडे, केंद्रात विज्ञान व तंत्रज्ञान विभागात शास्त्रज्ञ सुचिता लोखंडे यांनी त्यांना बोलतं केलं.
परिसंवादात बोलताना बिहारमधील अनेक वर्षाचा अनुभव सांगताना अनुपमा निळेकर म्हणाल्या की, शालेय जीवनात बिहारबाबत माझ्या मनात वेगळी प्रतिमा होती. मात्र प्रत्यक्षात ते राज्य वेगळे आणि समृद्ध असल्याचे त्यांना जाणवले. मला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. आज मी जितकी महाराष्ट्राची आहे तितकीच बिहारची आहे. आपल्या मूळ संस्कृतीसह आपण जिथे नोकरी करतो तिथेही स्थानिक सण-उत्सवांचा आदर राखला पाहिजे. तिथल्या लोकांशी जुळवून घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
तर भाग्यश्री बाणायत यांनी नागालँडमधील आपल्या अनुभवांची आठवण सांगितली. नागालँड केडर मिळाल्यानंतर सुरुवातीला काही सांस्कृतिक धक्के बसल्याचे त्या म्हणाल्या. मी पहिल्यांदा तिकडे गेले तेव्हा थोडीशी आजारी पडले. तेव्हा मला एका सहकाऱ्याने काळजीने सूप आणून दिले मात्र नंतर मला कळले की ते पांढऱ्या उंदराचे सूप होते, हा माझ्यासाठी मोठा सांस्कृतिक धक्का होता, असे त्या म्हणाल्या. पुढे मात्र अशा अनुभवांमधून शिकण्याची संधी मिळत गेल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिभा पारकर यांनी नोकरीनिमित्त विविध देशात सेवा दिली. या अनुभवाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, विविध देशांतील संस्कृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. कोरोना काळात परदेशात अडकलेल्या लोकांना मदत करता आली. वेळोवेळी परदेशातील मराठी मंडळांशी संपर्क ठेवून सांस्कृतिक उपक्रमात सहभागी झाले. जगातील काही देशांमध्ये महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती थोडीफार सांगता आली, शिकवता आली. हा प्रवास आव्हानात्मक असला तरी समृद्ध करणारा आहे, असेही त्या म्हणाल्या. रोहिणी भाजीभाकरे यांनी तामिळनाडूतील सेलम येथे पहिल्या जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाचा अनुभव मांडला.
जबाबदारी मोठी असली तरी सहकाऱ्यांच्या मदतीने उत्तम काम करता आले. तमिळ भाषा शिकण्याचा अनुभवही रंजक होता. चित्रपट आणि शोच्या माध्यमातून भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. शेवटी अनेक प्रयत्नाने ही भाषा शिकण्याचे त्या म्हणाल्या. या परिसंवादातून महिला अधिकाऱ्यांच्या विविध राज्यांतील आणि देशातील कार्याचा व्यापक अनुभव, सांस्कृतिक जुळवून घेण्याची क्षमता आणि प्रशासनातील त्यांचे योगदान अधोरेखित झाले.