राष्ट्रीय

आंब्याच्या पदार्थांत जगात मराठमोळा आमरस ‘नंबर वन’

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय हापूस आंब्याचे जगातील सर्वोत्कृष्ट आंब्यांत अढळ स्थान आहे. त्या पाठोपाठ आता आंब्याच्या पदार्थांत मराठमोळ्या आमरसने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. आंब्यांच्या पदार्थांत आमरससोबतच अस्सल भारतीय मँगो चटणीही समाविष्ट असून इतर पदार्थांत थायलंड, इंडोनेशिया व चीनच्या पदार्थांचा समावेश आहे.

टेस्ट अ‍ॅटलास या नामवंत ऑनलाईन फूड गाईडने केलेल्या अभ्यासात आंब्याची भारतातील लोकप्रियता ठसठशीतपणे समोर आली आहे. टेस्ट अ‍ॅटलासने जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, पाकक्रिया आणि लोकप्रियता या निकषांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली. महाराष्ट्रात घरोघरी चवीने खाल्ल्या जाणार्‍या आमरसाचे साधेपणातील श्रीमंती असे वर्णन टेस्ट अ‍ॅटलासने केले आहे. आमरसवर आधारित अनेक पदार्थ भारतात तयार केले जातात, असेही म्हटले आहे.

पाचव्या स्थानावर मँगो चटणी असून नावाप्रमाणेच चटकदार असलेली चटणी भारताच्या विविध प्रांतांत विविध घटक व पाकक्रिया वापरून केली जाते. आंब्याचा गोडवा हे जरी या चटणीचा मूळ आधार असला तरी त्यात विविध चवींचे होणारे मिश्रण या पदार्थाला चविष्टपणाच्या वेगळ्या पातळीवर नेतो, असे टेस्ट अ‍ॅटलासने वर्णन केले आहे.

आंब्याच्या टॉप 10 डिश

1. आमरस (महाराष्ट्र, भारत)
2. मँगो स्टिकी राईस (थायलंड)
3. सोर्बेत (फिलिपाईन्स)
4. रुजाक (जावा, इंडोनेशिया)
5. मँगो चटणी (भारत)
6. मँगो पोमेलो सागो (हाँगकाँग)
7. मांगुओ बुडींग (ग्वांगडाँग, चीन)
8. रुजाक सिंगुर (सुराबाया, इंडोनेशिया)
9. बाओबिंग (ग्वांगडाँग, चीन)
10. माम्वांग नाम्पा वान (थायलंड)

SCROLL FOR NEXT