NCERT Maratha Empire Map: एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याच्या निर्णयावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असून, महाराष्ट्रातील शाही घराण्यांचे वंशज आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
जुलै 2025 मध्ये NCERT ने इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या ‘Exploring Society: India and Beyond Part-I’ या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित केली होती. या पुस्तकाच्या 71 व्या पानावर ‘मराठा साम्राज्य’ दर्शवणारा नकाशा होता.
या नकाशामध्ये 1759 च्या काळातील मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवण्यात आला होता. दक्षिणेत तंजावूरपासून उत्तरेत पेशावरपर्यंत आणि पूर्वेला कटकपर्यंत मराठा साम्राज्य पसरल्याचं त्यात दर्शवण्यात आलं होतं.
याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की राजस्थानातील काही शाही घराणी आणि काही राजकीय नेत्यांनी या नकाशावर आक्षेप घेतल्यानंतर NCERT ने घाईघाईने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली.
मात्र, या समितीने कोणतीही ऐतिहासिक पडताळणी न करता आणि कोणतीही सार्वजनिक सूचना न देता डिजिटल आवृत्तीतून हा नकाशा हिंदी, इंग्रजी आणि उर्दू आवृत्त्यांमधून हटवला, असा आरोप करण्यात आला आहे.
साताऱ्याच्या शाही घराण्याशी संबंधित राजे मुधोजीराजे अजितसिंहराव भोसले आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
त्यांचं म्हणणं आहे की, हा निर्णय मनमानी पद्धतीने घेण्यात आला असून तो विद्यार्थ्यांच्या अचूक इतिहास जाणून घेण्याच्या अधिकारावर आणि सांस्कृतिक ओळखीवर आघात करणारा आहे.
याचिकेत काही गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत:
नकाशा हटवताना कोणतेही ठोस ऐतिहासिक पुरावे तपासण्यात आले नाहीत
समितीत मराठा इतिहासतज्ज्ञाचं पद रिक्त असताना हा निर्णय घेण्यात आला
महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकार आणि NCERT ला पत्र लिहून नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे
या प्रकरणामुळे इतिहासाच्या मांडणीवर आणि शालेय शिक्षणातील बदलांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे हा नकाशा हटवण्याचा निर्णय अनेकांच्या भावना दुखावणारा असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. आता या प्रकरणावर उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे इतिहास अभ्यासक, विद्यार्थी आणि मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे.