Maoist Commander Madvi Hidma Killed in Encounter:
भारतीय सुरक्षा दलं अन् नागरिकांवर झालेल्या २६ नक्षलवादी हल्ल्याचं नेतृत्व करणाऱ्या मडवी हिडमाचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सितारामराजू जिल्ह्यातील मरेदुमिल्ली जंगलात नक्षलवादी आणि आंध्र प्रदेश पोलीस यांच्यात चकमक उडाली होती. या भागाला आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमा लागून आहेत. या चकमकीत हिडमा सोबत जवळपास सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. हे ऑपरेशन अजून सुरू आहे.
आंध्र प्रदेशचे डीजीपी हरीश कुमार गुप्ता यांनी या चकमकीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगिलं की ही चकमक आज सकाळी ६ ते ७ च्या सुमारास सुरू झाली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत सहा माओवादी दहशतवादी ठार झाले आहेत. त्यात त्यांच्या लीडरचा देखील समावेश होता. नक्षलवादाविरूद्धचं मोठं ऑपरेशन सध्या सुरू आहे.
हिडमाचा जन्म हा मध्य प्रदेशातील सुकमा मध्ये १९८१ मध्ये हिडमाचा जन्म झाला होता. हिडमा हा पिपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या बटालियनंच नेतृत्व करत होता. तो सीपीआय माओवादी ग्रुपच्या निर्णय प्रक्रियेतील केंद्रीय समितीचा सर्वात तरूण सदस्य होता.
तो या संघटनेतील केंद्रीय समितीमधला बस्तर भागातील एकमेव आदिवासी सदस्य होता. हिडमावर ५० लाखाचं बक्षीस होतं. त्याची पत्नी राजाक्का ही देखील या चकमकीत ठार झाल्याचं समजतंय.
मडवी हिडमा हा अनेक मोठ्या हल्ल्याचा सूत्रधार होता. त्यानं २०१० मध्ये दंतेवाडातील हल्ल्यात देखील सहभाग घेतला होता. या हल्ल्यात ७६ सीआरपीएफ जवान ठार झाले होते. त्यानंतर त्यानं २०१३ मध्ये जिरम घाटीत देखील हल्ला केला होता. त्यात २७ लोकांचा जीव गेला होता. यामध्ये काँग्रेसचे अनेक बड्या नेत्यांचा देखील समावेश होता. हिडमानं २०२१ च्या सुकमा बिजापूर हल्ल्यात देखील मोठी भूमिका बजावली होती. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे २२ जवान ठार झाले होते.
अनेक मोठ्या हल्ल्यात सहभागी असलेल्या हिडमाचा खात्मा करणं ही सुरक्षा दलांसाठी मोठी कामगिरी आहे. यामुळं मोओवाद्यांना मोठा दणका बसला आहे. सध्या देशभरात नक्षलवादाविरूद्धची मोहीम वेगवान करण्यात आली आहे. अनेक नक्षलवादी शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या माहितीनुसार २४ तासात जवळपास ३०० माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केलं होतं.
माओवाद्यांच्या या आत्मसमर्पण प्रक्रियेतील सर्वात मोठं आत्मसमर्पण हे मालोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यांच होतं. त्यानं १४ ऑक्टोबर रोजी शस्त्र खाली ठेवलं अन् मुख्य प्रवाहात दाखल झाला.
त्यानं माओवाद्यांच्या कमांडरना जे सत्तेसाठी सशस्त्र संघर्ष करत आहेत. त्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा मार्ग त्यांना लोकांपासून दूर नेत आहे. हेच सशस्त्र संघर्षाच्या मार्गाचं अपयश आहे.
त्यानं सध्या कार्यरत असलेल्या माओवाद्यांना शस्त्र खाली ठेवून आत्मसर्पण करण्याचं आणि मुख्य प्रवाहात परतण्याचं आवाहन देखील केलं.