नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्या कार्यकाळाचे दुसरे वर्ष पुढील महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होत आहे. यादरम्यान, भाजपमध्ये संघटना आणि सरकार या दोन्ही पातळ्यांवर मोठ्या बदलांच्या हालचालींना वेग आला आहे. पक्ष आणि सरकारमधील अंतर्गत आढावा बैठकांनंतर भाजप आता 2027 च्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांची राजकीय रणनीती डोळ्यांसमोर ठेवून नवीन टीम तयार करण्याच्या तयारीत व्यस्त आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीच्या आढाव्यानंतर अनेक मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक (रिपोर्ट कार्ड) केंद्रीय नेतृत्वाच्या अपेक्षांवर खरे उतरलेले नाही. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. किमान आठ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. यामध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या नावांचा प्रामुख्याने समावेश आहे. काही मंत्र्यांना सरकारमधून हटवून संघटनेत जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चाही पक्षात जोरात सुरू आहे. मंत्रिमंडळात पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील काही नवीन चेहरे पाहायला मिळू शकतात. या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुका पाहता भाजप नेतृत्वाला संघटना अधिक आक्रमक आणि तरुण चेहर्यांसह सज्ज करायची आहे. भाजपमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा अशा मुख्यमंत्र्यांची आहे, ज्यांना संघटनेत पाठवले जाऊ शकते. सूत्रांनुसार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या नेतृत्वात बदलाच्या शक्यतेवर विचार सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता
उत्तराखंडमध्येही नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या कामकाजावर केंद्रीय नेतृत्व पूर्णपणे समाधानी नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पुढील वर्षी तेथे विधानसभा निवडणुका होणार असून, पक्ष नवीन चेहर्याच्या माध्यमातून सत्ताविरोधी लाट (अँटिइन्कम्बन्सी) नियंत्रित करण्याच्या रणनीतीवर विचार करत आहे.
तावडेंचे स्थान कायम
संघटनेत सरचिटणीस विनोद तावडे आणि तरुण चुग यांची भूमिका कायम राहू शकते. संघटनेतील सर्वात महत्त्वाचा बदल संघटन सरचिटणीसपदाबाबत होऊ शकतो. प्रदीर्घकाळापासून संघटनेचे रणनीतीकार मानले जाणारे बी. एल. संतोष यांच्या जागी सुनील बन्सल यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. एवढेच नाही, तर उपाध्यक्षांच्या संख्येतही वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. 11 उपाध्यक्षांऐवजी आता 15 उपाध्यक्ष केले जाऊ शकतात.
33 टक्के महिलांना संधी
भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या टीमबाबतही विचारमंथन वेगाने सुरू आहे. संघटनेत पिढीजात बदल (जनरेशनल शिफ्ट) घडवून आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. नव्या टीममध्ये 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना अधिक संधी दिली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये 33 टक्के महिलांना स्थान मिळणे निश्चित मानले जात आहे. पक्षाच्या मीडिया आणि प्रचार विभागामध्येही मोठे बदल होणार असून, संपूर्ण मीडिया टीम बदलली जाईल.