राष्ट्रीय

Mamata Banerjee | ममता बॅनर्जींना मोठा धक्का! विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जींना दिली विरोधी पक्षनेतेपदाची मान्यता

TMC Rebel MLAs | बंगाल सरकारच्या धोरणांना विनाकारण विरोध करणार नाही : ऋतब्रत बॅनर्जी

पुढारी वृत्तसेवा

TMC Rebel MLAs : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधून (TMC) फुटून बाहेर पडलेल्या बंडखोर आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांची आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे आमदार अखरुज्जमां यांनी आरोप केला आहे की, विरोधी पक्षनेत्याच्या निवडीमध्ये पक्ष नेतृत्वाने योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही.

आम्‍ही विनाकारण विरोध करणार नाही : ऋतब्रत बॅनर्जी

ऋतब्रत बॅनर्जी यांनी एक पत्रकही जारी केले आहे. ते म्हणाले की, "तृणमूल विधिमंडळ पक्षात ५८ आमदारांचा गट आहे, ज्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकली आहे. आणखी दोन आमदारही आमच्या गटात सामील होऊ शकतात." जावेद खान, संदीपन साहा, सबीना यास्मीन आणि शिउली साहा हे तृणमूल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे उपनेते असतील. आम्ही बंगाल सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करू, मात्र विनाकारण विरोध करणार नाही."

ममता बॅनर्जींनी संभाळावी पक्षाचे मुख्य सल्लागार म्हणून जबाबदारी

या घडामोडींनंतर ऋतब्रत बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे एक विशेष मागणीही केली आहे. "आम्ही ममता बॅनर्जी यांना विनंती करतो की त्यांनी तृणमूल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळावी," असे ते म्हणाले. संसदीय नियमांनुसार पश्चिम बंगाल विधानसभेत आम्हीच खरा आणि मुख्य विरोधी पक्ष आहोत, असा दावाही त्यांनी केला. तसेच, पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला विधिमंडळ पक्षाचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली असल्याचे ऋतब्रत यांनी सांगितले.

ऋतब्रत बॅनर्जी यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

तत्पूर्वी, विधानसभेतील विरोधी पक्षाचे शक्तिप्रदर्शन आणि समीकरणे पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या एका मोठ्या घडामोडीत, ऋतब्रत बॅनर्जी यांनी बंडखोर आमदार संदीपन साहा आणि इतर नाराज आमदारांसह विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ५८ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे समर्थन पत्र अध्यक्षांना सुपूर्द केले. बंडखोर गटाने नवीन नेतृत्वाची रचनाही प्रस्तावित केली होती, ज्यामध्ये ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी विधिमंडळ पक्षाचे नेते, जावेद खान, संदीपन साहा आणि शिउली साहा यांना उपनेते, तर रघुनाथगंजचे आमदार अखरुज्जमां यांना मुख्य प्रतोद (Chief Whip) म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला बंडखोर आमदारांची उपस्थिती

याआधी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे तृणमूल काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अंतर्गत बंडाचा सामना करणाऱ्या तृणमूल काँग्रेसमधील या घडामोडीकडे एक नवे राजकीय वळण म्हणून पाहिले जात आहे.तृणमूल विधिमंडळ पक्षात उभी फूट पडण्याच्या चर्चांदरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या जुन्या निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या आमदार नयना बंदोपाध्याय, कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम, अशोक देव आणि कुणाल घोष हे राज्य सचिवालय 'नबान्न' येथे आयोजित या प्रशासकीय बैठकीला हजर होते.

ममता बॅनर्जींच्या धरणे आंदोलनाकडे फिरवली पाठ

विशेष बाब म्हणजे, बंडखोरांच्या बैठकीत किंवा या घडामोडींमध्ये समाविष्ट असलेल्या आमदारांपैकी एकही आमदार मंगळवारी मध्य कोलकाता येथे झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या धरणे आंदोलनात दिसला नव्हता. यावरून पक्षाचे पारंपारिक नेतृत्व आणि नाराज गट यांच्यातील दरी स्पष्टपणे समोर आली आहे.दुसरीकडे, हकीम, बंदोपाध्याय, देव आणि घोष यांच्यासह कालीघाट (ममता बॅनर्जींचे निवासस्थान) गटाशी जोडलेल्या अनेक नेत्यांनी विधानसभेतील बंडखोरांच्या बैठकीपासून अंतर राखले होते, मात्र ते मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय बैठकीला मात्र आवर्जून उपस्थित राहिले.काही दिवसांपूर्वी, तृणमूलच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार आणि पक्षाच्या सहा आमदारांनी कल्याणी येथे शुभेंदू अधिकारी यांनी बोलावलेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत भाग घेतला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी गोटात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT