माजी पंतप्रधान मनमोहन सिंग Pudhari File Photo
राष्ट्रीय

Manmohan Singh : आर्थिक क्रांतीचा जनक हरपला

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचे सलग दहा वर्षे पंतप्रधानपद भूषविणारे, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, भारतातील आर्थिक क्रांतीचे जनक आणि अजातशत्रू राहिलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहनसिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात हृदयाच्या आजारपणामुळे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.

हृदयाशी संबंधित आजारामुळे मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. फुफ्फुसात संसर्ग झाल्यानेत्यांना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एम्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी जीवनरक्षक प्रणालीला प्रतिसाद देणे बंद केले आणि गुरुवारी रात्री 9.51 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली आहेत. त्यांच्या निधनाने जागतिक कीर्तीचा अर्थतज्ज्ञ आणि भारतीय अर्थक्रांतीचा जनक देशाने गमावला आहे, अशा शब्दांत देशभरातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सलग दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषविले. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, भारतीय रिझर्व्ह बँकेच गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री ते भारताचे सलग दहा वर्षे पंतप्रधान अशी देदीप्यमान कारकीर्द त्यांनी गाजविली. जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे.

जागतिकीकरणाचे शिल्पकार

डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ होते. 90 च्या दशकात आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी आर्थिक उदारीकरणाची जोड देत संकटातून बाहेर काढले. अथक प्रयत्नांमुळे जागतिकीकरणाच्या दिशेने त्यांनी भारताला चालना दिली. त्यांचे योगदान केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते, तर ते जागतिक आर्थिक सुधारणांच्या पटलावर भारताचा ठसा उमटवणारे एक आदर्श नेते होते.

आर्थिक क्रांतीचे जनक

1991 साली भारत आर्थिक संकटात सापडला होता. परकीय गंगाजळी संपल्याने देशावर आर्थिक दिवाळखोरीचे संकट होते. त्याचवेळी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली. आपल्या आर्थिक धोरणांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य दिले.

परकीय गुंतवणूक खुली करणे, परवाना राजवट संपुष्टात आणणे, व्यापार आणि आयात-निर्यातीवरील निर्बंध शिथिल करणे, या निर्णयांनी भारताच्या आर्थिक सुधारणांचे नवे युग सुरू झाले.

शांत आणि संयमी नेतृत्व

पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात भारताचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात भारताने जागतिक स्तरावर आपली आर्थिक ताकद सिद्ध केली. त्यांनी शांततामय आणि स्थिर नेतृत्वाची उदाहरणे घालून दिली.

डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान

1. जागतिकीकरणाचा पाया : भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग, तंत्रज्ञान, आणि सेवाक्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले.

2. भारत-अमेरिका अणुकरार : अणुशक्तीच्या शांततामय उपयोगासाठी त्यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय भारताच्या सामरिक ताकदीसाठी मोलाचा ठरला.

3. गरिबी निर्मूलन : त्यांच्या काळात अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी झाली, जसे की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा).

आदर्श व्यक्तिमत्त्व

डॉ. मनमोहन सिंग यांची साधी राहणी, सुसंस्कृतता, आणि त्यागभावना यामुळे ते फक्त नेतेच नव्हे, तर भारतीय जनतेसाठी प्रेरणास्थान ठरले. राजकारणात असूनही त्यांनी वैयक्तिक स्वच्छ प्रतिमा जपली.

आधुनिक भारताचे शिल्पकार

डॉ. मनमोहन सिंग यांचा वारसा म्हणजे कष्ट, समर्पण, आणि प्रामाणिकतेचा आदर्श आहे. त्यांनी भारताच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आणि देशाच्या तरुण पिढीला स्वप्न पाहायला शिकवले. त्यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्था आणि राजकीय पटलावर पोकळी निर्माण झाली आहे. परंतु, त्यांनी उभारलेली आर्थिक आणि सांस्कृतिक संपत्ती कायम प्रेरणा देत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT