मुख्‍यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्‍याकडे राजीनामा सादर केला.  
राष्ट्रीय

मोठी बातमी : बिरेन सिंह यांनी दिला मणिपूरच्‍या मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा

मागील वर्षी राज्‍यातील जातीय हिंसाचारामुळे राहिले हाेते चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी आज (दि. ९) पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्‍याकडे राजीनामा सादर केला.

मागील वर्षी राज्‍यातील जनतेची मागितली हाेती माफी

डिसेंबर २०२४ मध्‍ये त्‍यांनी मणिपूरमधील जातीय हिंसाचाराबद्दल जनतेची माफी मागितली होती. ते म्‍हणाले होते की, हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. ३ मे २०२३ पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो. अनेकांनी त्यांचे प्रियजन गमावले. अनेक लोक आपली घरे सोडून गेले. मला याबद्दल वाईट वाटते. गेल्या तीन-चार महिन्यांतील शांततापूर्ण परिस्थिती पाहून, मला आशा आहे की २०२५ मध्ये राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत होईल.

बिरेन सिंह सलग दुसर्‍यांदा झाले हाेते मुख्‍यमंत्रीपदी विराजमान

मणिपूरमध्‍ये २०२२ मध्‍ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च अशा दोन टप्‍प्‍यांत मतदान झाले होते. ६० जागा असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपला ३२ जागा मिळाल्‍या होत्‍या. यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्‍या तब्‍बल ११ जागा वाढल्‍या. २०१७ मधील विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने नॅशनल पीपल्‍स पार्टी, नागा पीपल्‍स फ्रंट, लोक जनशक्‍ती पार्टी यांच्‍या मदतीने सरकार स्‍थापन केले होते. २०२२ मध्‍ये मणिपूरच्‍या मुख्‍यमंत्रीपदी एन बिरेन सिंह हे सलग दुसऱ्यांदा विराजमान झाले होते.

मणिपूरमध्‍ये २०२३ मध्‍ये झालेल्‍या जातीय हिंसाचाराचे देशभरात पडसाद

मणिपूरमध्‍ये मे २०२३ मध्‍ये जातीय हिंसाचाराचा भडका उडाला होता. मैतेयी विरुद्ध इतर जमाती यांच्यात अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यावरून पेटलेल्या संघर्षाने राज्‍यातील विविध जिल्‍ह्यात दंगल उसळली. शेकडो बळी घेणार्‍या या दंगलीमुळे देशभरातील चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी मणिपूर होते. दंगल काळात लष्‍काराला 23 हजार नागरिकांना दंगलग्रस्त भागांतून सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्कर इम्फाळ खोर्‍यातील हिंसाचारा आटोक्‍यात आणण्‍याचा प्रयत्‍न केला. यानंतर सलग काही महिने मैतेयी आणि इतर जमातीमधील संघर्ष सुरुच राहिला. याच काळात बिरेन सिंह यांच्‍यावर राजीनाम्‍यासाठीचा दबाव वाढत होता. मात्र ते पदावर कायम राहिले. २०२४ च्‍या अखेरीस त्‍यांनी हिंसाचारावर राज्‍यातील जनतेची माफीही मागितली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT