बंगळूर : कुकरमध्ये बॉम्ब लपवून मंगळूरमध्ये स्फोट घडवून आणल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद शरिक या इसिसच्या दहशतवाद्याला ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 19 नोव्हेंबर 2022 रोजी मंगळूरमध्ये एका रिक्षात हा स्फोट झाला होता. त्यात स्वत़ःशरिक आणि रिक्षाचालक तसेच काही प्रवाशी जखमी झाले होते.
शरिक एका रिक्षातून हा कुकर बॉम्ब घेऊन जात होता. तो गर्दीच्या ठिकाणी लपवून त्याचा स्फोट घडवून आणण्याचे नियोजन होते. मात्र, त्याआधी वाटेतच त्याचा स्फोट झाला. त्यानंतर जखमी शरिकला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून एकूण 16 जणांची नावे पुढे आली. पैकी मुख्य आरोपी असलेल्या शरिकला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे सरकारी पक्षाने केली होती. शरिकने गेल्या डिसेंबरमध्ये आपला गुन्हा कबूल केला होता.
शरिक विवाहित असून, त्याला एक लहान मुलगी आहे, त्यामुळे शिक्षा कमी करावी, अशी विनंती शरिकच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. आपल्या मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी असल्याने शिक्षेत कपात करण्याची मागणी केली होती. आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्यामुळे आणि मानवतावादी दृष्टिकोनातून न्यायालयाने त्याला 10 वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शरिकने यापूर्वीच 4 वर्षे तुरुंगवास भोगला असल्याने न्यायालयाने ही बाब विचारात घेतली आणि उर्वरित 6 वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
कोण आहे मोहम्मद शरिक?
मोहम्मद शरिकचे इसिस संघटनेशी संबंध होते. 2020 पासून तो दहशतवादी कारवायांत गुंतला होता. 2022 च्या सप्टेंबर महिन्यात शिमोग्यातील दहशतवादी कारवायांत त्याचा सहभाग होता. तो शिमोगा परिसरातील तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत होता, असाही संशय आहे.