Supreme Court | खाद्यपदार्थांच्‍या पाकिटांवर ‘हाय-शुगर/सॉल्ट’चे लेबल बंधनकारक  
राष्ट्रीय

Supreme Court | खाद्यपदार्थांच्‍या पाकिटांवर ‘हाय-शुगर/सॉल्ट’चे लेबल बंधनकारक

‘एफएसएसएआय’ला नियम कडक करण्‍याचे ‘सुप्रीम’ निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : पाकीटबंद खाद्यपदार्थांवर आता कंपन्‍यांना ‘हाय फॅट’, ‘हाय शुगर’ किंवा ‘हाय सॉल्ट’ यासारख्‍या इशार्‍यांचे लेबल लावणे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना आरोग्यदायी पर्याय निवडण्यास मदत होणार असून, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय अन्‍न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) या संदर्भातील नियम अधिक कडक करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ‘फ्रंट-ऑफ-पॅकेज न्यूट्रिशन लेबलिंग’ (एफओपीएनएल) नियम अधिक कडक करावेत, असे निर्देश ‘एफएसएसएआय’ला दिले. अन्‍न सुरक्षा व मानके (लेबलिंग आणि प्रदर्शन) विनियम, २०२० सह विद्यमान नियमांची शब्द आणि भावनेनुसार काटेकोर अंमलबजावणी होईल याची केंद्र सरकारने खात्री करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

...असे आहेत निर्देश

* साखर, मीठ किंवा फॅट मर्यादेपेक्षा जास्त असलेल्‍या अन्‍नपदार्थांच्‍या पाकिटांवर पुढील भागावर स्पष्ट लाल रंगाची चेतावणीची चिन्हे लावली जावीत.

* पाकिटाच्या दर्शनी भागावर ‘ॲडेड शुगर’ व ‘ॲडेड फॅट’ऐवजी ‘टोटल शुगर’ आणि ‘सॅच्‍युरेटेड फॅट’ हे मिठासोबत चिंताजनक पोषक घटक म्हणून दाखवावेत.

* प्रत्येक हानिकारक घटकासाठी स्वतंत्र षटकोनी खूण बंधनकारक.

* त्यात संबंधित घटकाच्या चित्रासोबत शेजारी ‘हाय फॅट’, ‘हाय शुगर’ किंवा ‘हाय सॉल्ट’ असे शब्द लिहिणे बंधनकारक.

न्यायालयाच्या निर्देशाचा अर्थ...

सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन निर्देशाचा थेट अर्थ असा आहे की, आता पाकीटबंद खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनाचा आरोग्यावर होणारा परिणाम ग्राहकांपासून लपवू शकणार नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना खाद्यपदार्थाचे पाकीट पाहताच ते उत्पादन त्यांच्या आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे, हे समजू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT