Pregnant Wife Murder file photo
राष्ट्रीय

Pregnant Wife Murder: भयंकर! आवडीची भाजी बनवली नाही म्हणून गर्भवती पत्नीची कुऱ्हाडीने मान तोडली, पतीला अटक

आवडीची भाजी बनवण्यास नकार दिला, या किरकोळ कारणावरून पतीने आपल्या गर्भवती पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोहन कारंडे

Pregnant Wife Murder

मध्य प्रदेश: फक्त आवडीची भाजी बनवण्यास नकार दिला, या किरकोळ कारणावरून पतीने आपल्या गर्भवती पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये खरगोन जिल्ह्यातील चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामर्डा गावात ही खळबळजनक घटना घडली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील आणि त्याची पत्नी शीला (वय २५) यांच्यात शुक्रवारी जेवणावरून वाद झाला. सुनीलला पालकची भाजी खायची होती, मात्र शीलाने आधीच दुसरे जेवण तयार असल्याचे सांगून पालकची भाजी नंतर बनवते असे म्हटले. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने सुनीलने रागाच्या भरात शीलाला घरामागच्या शेतात २०० फूट फरफटत नेले आणि तिच्या मानेवर कुऱ्हाडीने दोन सपासप वार केले. या हल्ल्यात शीलाचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर स्वतःच दिली कबुली

घटनेच्या वेळी सुनीलची आई आणि धाकटा भाऊ घरी नव्हते. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पळून न जाता थेट आपल्या नातेवाईकाचे घर गाठले आणि त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. हे दाम्पत्य नुकतेच महाराष्ट्रातून मजुरीचे काम करून परतले होते. त्यांना ३ आणि ५ वर्षांची दोन लहान मुले आहेत.

घटनेची माहिती मिळताच मृत शीलाच्या माहेरच्या लोकांनी गावात एकच गर्दी केली. संतप्त नातेवाईकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत जोरदार गोंधळ घातला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गावात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्तात शीलाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार पार पडले.

भिकनगावचे एसडीओपी राकेश आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनीलला शनिवारी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही कुटुंबांमध्ये सलोख्याचे संबंध होते आणि त्यांच्यात एकमेकांकडे अनेक लग्नेही झालेली आहेत, तरीही एवढ्या छोट्या कारणावरून हा टोकाचा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT